सैराट सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीसह संपूर्ण बॉलिवूडला याड लावणारे गुणी दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना काहितरी नवीन देण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच नवीन सिनेमा घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची माहिती झी स्टुडिओजच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. याचाच अर्थ नागराज मंजुळे यांचे नवीन प्रोजेक्ट झी स्टुडिओजच्याच साथीने आकाराला येत आहे.
झी स्टुडिओने या ट्विट्सोबत एक काही सेकंदांचा व्हिडीओसुध्दा प्रदर्शित केला आहे. परंतु नवीन सिनेमाचं नाव मात्र अद्याप यातून उलगडण्यात आलेले नाही. नागराज मंजुळेंवरसुध्दा या नवीन प्रोजेक्टसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण नेमका कुठला सिनेमा असणार, विषय काय असेल याबाबतच्या चर्चांना आता उधाण आले आहे.
https://twitter.com/TheZeeStudios/status/1029224029519900672
सैराटने सिनेसृष्टीत नवीन पायंडा घातला आणि मराठी सिनेमाला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवलं. बॉलिवूडकरांनासुध्दा या सिनेमाचा हिंदी रिमेक करण्याचा मोह आवरता आला नाही. नेहमी सामाजिक प्रश्नांवर आपल्या सिनेमातून वाचा फोडणा-या नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.