'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीज अलीकडेच हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजमध्ये प्रिया बापट, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ऑनलाइन विश्वात ही वेबसिरीज प्रिया बापटने दिलेल्या बोल्ड दृश्यांमुळे सध्या चर्चेत आहे. यामुळे प्रिया बापटला सर्वच स्तरांमधून बऱ्या-वाईट प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे.
याबाबत पिपिंगमुन मराठीशी बोलताना प्रिया बापट म्हणाली,''एका मिनिटांच्या छोट्या क्लीपमधून लोक चारित्र्यावर डाग ठेवतात जे चुकीचं आहे. तुम्ही संपूर्ण सिरीज पाहिल्यावर त्या दृश्याची काय गरज आहे, ते दृश्य किती महत्वाचं आहे हे तुम्हाला कळेल. हे दृश्य कामाचा एक भाग आहे, या दृष्टीकोनामधून त्याकडे बघितलं पाहिजे.''
याबाबत बोलताना प्रिया बापट पुढे म्हणाली,''कलाकारांचं जे काम असतं ते काम करून कलाकार घरी जातो. त्यावरून त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासारखं काही नसतं. सगळ्यात महत्वाचा भाग आपण काम कोणासोबत करतोय, प्रोजेक्ट काय आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे मी काही गैर किंवा आक्षेपार्ह्य केलय असं मला अजिबात वाटत नाही. ज्यांना हे घाण वाटत आहे त्यांनी जरा संकुचित वृत्ती बाजूला ठेवून समाजाकडे बघावं. दुसऱ्यांच्या मताचा आदर करणं त्यांनी शिकलं पाहिजे.''
प्रिया बापट या वेबसिरीजमध्ये पूर्णिमा गायकवाड ही व्यक्तिरेखा साकारत आहे. एक महत्वाकांक्षी, आत्मविश्वासू अशी ही व्यक्तिरेखा या सिरीजमध्ये पाहायला मिळत आहे. हे धाडसी पात्र साकारल्याबद्दल प्रियावर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव होत आहे.