सुरुवातीपासून सर्वत्र चर्चेत असलेल्या 'मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित' ‘बाबो’ या मराठी सिनेमाचा भन्नाट ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या वेळेस सिनेमाचे निर्माते सचिन बाबुराव पवार, सहनिर्माती तृप्ती सचिन पवार, दिग्दर्शक रमेश चौधरी यांच्यासह या सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
‘बाबो’या सिनेमात एका गावात राहणारे इरसाल नमुने व त्यांच्या भानगडी मिश्कील पद्धतीने मांडल्या आहेत. ट्रेलरची सुरुवातच मुळात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका सुंदर गावाचे चित्र दाखवत मंगलाष्टकांनी होते. त्यामध्ये भारत गणेशपुरे स्पर्धापरीक्षेचे मार्गदर्शन करत असलेल्या टी.व्ही.अँकरच्या भूमिकेत दिसत आहे. तर विनोदी भूमिका साकारणारे किशोर कदम यांची सयाजी शिंदे यांच्या बरोबर गावाकडची खुमासदार शैलीतील भांडणांची जुगलबंदी पहायला मिळते.
यामधील गावाच्या अनेक समस्या आहेत. पण सर्वात मोठी समस्या म्हणजे एका नवविवाहित दाम्पत्याला आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे, मात्र त्यांचा जागरण गोंधळ झालेला नाही. आणि दुसरीकडे गावात अवकाशातील यान कोसळणार असल्याची बातमी टीव्हीवर ऐकायला मिळते. त्यानंतर गावात एकच कल्लोळ निर्माण झालेला दिसतो. असा एक आगळावेगळा धम्माल गोंधळ 'बाबो'च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
या सिनेमाची कथा अरविंद जगताप यांनी लिहिली आहे. आजवर अनेक सिनेमांत मनोरंजक भूमिका साकारणारे अनेक कलाकार या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, संवेदनशील कवी आणि अभिनेते किशोर कदम यांच्यासह भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, प्रतिक्षा मुणगेकर, निशा परुळेकर, विजय निकम, जयवंत वाडकर आदी कलाकारांची फौज या सिनेमात आहे.
या सिनेमाला रोहित नागभिडे आणि हर्ष-करण-आदित्य (ट्रीनिटी ब्रदर्स) यांचे संगीत लाभले आहे. यातील ‘म्याड रं’ आणि ‘नाचकाम कंपल्सरी’ ही दोन गाणी सध्या सर्वत्र गाजत आहेत. मंगेश कांगणे हे या गाण्यांचे गीतकार असून हे सर्व कलाकार एकत्र येऊन काय धम्माल करणार हे ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्राला समजणार आहे.
https://www.youtube.com/watch?time_continue=2&v=khBfj_1_K50