By  
on  

सोनी मराठी 19 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

सोनी मराठी या नवीन वाहिनीच्या माध्यमातून Sony Pictures Networks India (SPN) मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये एक नवीन पायंडा घालू पाहत आहे. आजच्या काळाला अनुरूप असे विषय घेऊन येणारी ही नवीन वाहिनी येत्या १९ ऑगस्टला घराघरांत पोहोचणार असून मराठी प्रेक्षकांसाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्रित पाहण्याजोग्या अशा कलाविष्कारांची एक पर्वणी असेल. आशयघन मालिकांच्या माध्यमातून ‘विणूया अतूट नाती’ या आपल्या मूळ विचाराशी एकनिष्ठ राहत  सोनी मराठीचा मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी अतूट नाती विणण्याचा प्रयत्न असेल.

वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषय मांडणी असलेल्या ९ कथा मालिका आणि २ कथाबाह्य कार्यक्रम सोनी मराठी सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांना सुपूर्द करेल. कथा मालिकांमध्ये ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘ह.म.बने तु.म.बने’, ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘ती फुलराणी’, ‘दुनियादारी फिल्मी इष्टाईल’, ‘Year Down’, ‘भेटी लागी जीवा’, ‘हृदयात वाजे Something’, ‘गर्जा महाराष्ट्र’ह्यांचा समावेश आहे. ह्या मालिकांमध्ये नवीन आणि आजच्या काळाशी सुसंगत विषय हाताळलेले आहेत. तसेच ‘महाराष्ट्राचा Favorite Dancer’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हे कार्यक्रम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन नक्कीच करतील. १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५५व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार भव्य सोहळ्याच्या प्रक्षेपणाचे औचित्य साधून Sony मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मनोरंजनाच्या या रोजच्या खजिन्याबरोबरच ही वाहिनी मराठी रसिकांसाठी दर्जेदार मराठी चित्रपटांचा संच देखील घेऊन येणार आहे.

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्ट आणि चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, एन.पी.सिंग म्हणाले, “अतिशय वेगाने विकसित होणाऱ्या मराठी मनोरंजन क्षेत्रात, SPN च्या सीमा रुंदावणारे Sony मराठी हे नवीन पाऊल जाहीर करताना आम्हाला नक्कीच खूप आनंद होत आहे. SPN समूहासाठी मनोरंजन हा नेहमीच एक अग्रस्थानी गणला गेलेला विषय आहे. आणि म्हणूनच आमच्या ‘विणूया अतूट नाती’ ह्या मूळ विचाराशी एकनिष्ठ रहात सर्व वयोगटांना आपलेसे वाटणारे, जुन्या परंपरांना नव्या दृष्टीकोनातून पाहणारे विषय घेऊन, आम्ही घेऊन येत आहोत उच्च निर्मितीमूल्य असलेले कार्यक्रम आणि मालिका तुमच्यासाठी लवकरच, सोनी मराठीवर.”

सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर म्हणाले, “अजय भाळवणकर, महाराष्ट्राला संस्कृतीची आणि विचारांची वैभवशाली परंपरालाभलेली आहे. या महाराष्ट्र देशासाठी एक नवीन मनोरंजनवाहिनी सुरु करणं आमच्यासाठी जेवढं आव्हानात्मक होतं तेवढंच अभिमानचं होतं. मराठी प्रेक्षकांनी कसदार विषयांना नाटक व चित्रपटांच्या माध्यमातून नेहमीच साथ दिली. त्याच प्रकारचे कसदार विषय आपल्या रोजच्या टीव्ही माध्यमाद्वारे  तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या नवीन कलाकृती मराठी प्रेक्षक आनंदाने स्वीकारतील अशी आम्हाला खात्री आहे.”

Sony मराठी सर्व मुख्य डायरेक्ट टू होम (DTH) आणि डिजिटल केबल प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive