आंतरराष्ट्रीय गायक अॅकाॅनच्या आवाजाची जादू आता मराठीत?
अॅकाॅन हा ख्यातनाम असा जगप्रसिद्ध गायक. 'स्मॅक दॅट' हे त्याने गायलेलं गाणं खूप लोकप्रिय आहे. या जगप्रसिद्ध गायकाने बॉलीवूडमधील 'छम्मक छल्लो' या गाण्यासाठी सुद्धा आवाज दिला होता. सूत्रांच्या माहितीनुसार हा गायक लवकरच एक मराठी गाणं गाणार असल्याची शक्यता आहे.
मराठीमधले आघाडीचे व्यावसायिक अक्षय गिरमे हे एका मराठी संगीत अल्बमसाठी अॅकाॅनशी याबाबतीत चर्चा करत आहेत. याबाबतीत अक्षय म्हणाले,''इतक्या लवकर याबाबतीत मी काही सांगू शकत नाही. पण अॅकाॅनशी या संगीत अल्बमसाठी बोलणी सुरु आहेत. सर्व गोष्टी जर नीट जुळून आल्या तर लवकरच या अल्बमच्या शूटिंगला सुरुवात होऊन २०१९ च्या अखेरीस हा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येईल.''
अक्षयच्या बोलण्यानुसार या गाण्याचा व्हिडिओ लोणावळ्याच्या आसपास शूट होणार आहे तसेच 'गल्ली बॉय' या सिनेमातील एक रॅपर सुद्धा या अल्बममध्ये झळकण्याची शक्यता आहे. लवकरच याविषयी अधिक माहिती बाहेर येईलच पण तूर्तास अॅकाॅन हा मराठीत गाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.