ज्येष्ठ अभिने विजय चव्हाण यांचे आज मुलुंड येथील फोर्टीस रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बुधवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीतील एक तारा निखळला.
“मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार हरपला. पण विजयच्या जाण्याने फक्त सिनेसृष्टीचंच नुकसान नाही झालं, तर आम्हा सर्वांचंसुध्दा झालं आहे. आमचा एक चांगला मित्र आम्ही आज गमावला आहे. त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीतली ही पोकळी कधीच भरुन येण्यासारखी नाही. कुठल्याही भूमिकेत चपखल बसणं हे त्याचं खास वैशिष्ट. मोरूची मावशी या नाटकातील मावशीची भूमिका त्याने अजरामर केली. संपूर्ण मनोरंजन विश्वात त्याने स्वत:चं एक स्थान निर्माण केलं होतं.”अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
तर विजय चव्हाण यांचे मोरुची मावशी नाटकातील सहकलाकार आणि मित्र अभिनेते प्रदिप पटवर्धन यांना तर त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अश्रूचं आवरता येत नव्हते. ते म्हणाले, “एक चांगला कलाकार इतक्या लवकर जाणं, हे सहन करणं कठिण आहे. सर्वांना नेहमी सांभाळून घेणारा हरहुन्नरी कलाकार हरपला. तो एक प्रतिम अभिनेता होता. मोरुची मावशी नाटकातील माझा विजयसोबतचा अनुभव शब्दांत मांडता येणार नाही. इतकंच सांगतो सर्वांच्या मदतीला धावून येणारा एक मित्र आम्ही आज गमावला आहे.”
विजय चव्हाण यांचा जन्म मुंबईतील लालबागमध्ये झाला. याच भागात ते लहानाचे मोठे झाले लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. अभिनयाची त्यांना पहिल्यापासूनचं आवड होती.