बॉलिवूड लव्हबर्ड्स दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली असून याबाबतची आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याची सुरुवात एका शुभ कार्यापासून होणार आहे. दिपीकाची आई उज्जवला पादुकोण यांनी दिपीकाच्या लग्नापूर्वी घरी मोठा पूजा विधी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजी वेबसाईट स्पॉट बॉयला मिळालेल्या वृत्तानुसार दिपीकाची आई त्यांच्या बॅंगलोर येथील घरी लग्नसोहळ्याच्या 10 दिवस अगोदर हा पूजा विधी आयोजित करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या पूजेला रणवीरसह त्याचे संपूर्ण कुटुंबिय यात सहभागी होणार आहेत.
रणवीर आणि दिपीकाच्या शानदार लग्नसोहळ्याच्या अनेक चर्चा संध्या रंगताना दिसतायत. त्यांच्या कपडयांपासून ते फोटोग्राफर आणि वेडिंग प्लॅनरपर्यंत. दिपवीर 20 नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो येथे बोहल्यावर चढणार आहेत. तसंच या लग्नसोहळ्यात दोघांचेही फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे या खासगी लग्नसोहळ्यात दिपीका-रणवीर यांनी पाहुण्यांना मोबाईल फोन आणि कॅमे-याशिवाय येण्याची विनंती केली आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नावरुन धडा घेत हा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे. लग्नातील खास क्षणाचे फोटो बाहेर व्हायरल होऊ नये, यासाठी ही दक्षता हे दोघे घेत असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच रणवीर-दिपीका या बॉलिवूड लव्ह-बर्ड्सना फ्लोरिडा येथे सिक्रेट व्हेकेशन साजरे करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.