By  
on  

‘टेक केअर गुड नाईट’निमित्ताने महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि गिरीश जोशी पुन्हा एकत्र

आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर हे ‘टेक केअर गुड नाईट’ या आगामी सिनेमात एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सामाजिक संदेश देणाऱ्या या सिनेमाची पटकथा वाचल्यावर त्यांनी स्वतःहून हीच भूमिका करणार असल्याचे लेखक-दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी यांना सांगून टाकले होते. स्वतःच्या प्रत्येक सिनेमातून काहीतरी सामाजिक संदेश द्यावा असा प्रयत्न करणाऱ्या मांजरेकर यांनी सायबर गुन्हेगारीवर भाष्य करणाऱ्या आणि यामुळे सामाजिक व कौटुंबिक असे कोणते दुष्परिणाम उद्भवतात, हे प्रभावीपणे मांडणाऱ्या अशा या सिनेमाशी जोडले जाण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला.

महेश मांजरेकर यांच्यासह या सिनेमात सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एसपी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे.

महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि गिरीश जयंत जोशी यांनी काही वर्षांपूर्वी ‘काकस्पर्श’ हा पुरस्कार विजेता सिनेमा एकत्र केला होता. तेव्हाच या तिघांमध्ये पुन्हा एखादा सिनेमा एकत्र करण्याचे ठरले होते. जेव्हा जोशी यांनी या दोघांना ‘टेक केअर गुड नाईट’ची कथा ऐकवली तेव्हा या दोघांनीही लगेच होकार दिला. दोघांनाही ही कथा आवडली. सचिन खेडेकर यांच्या मध्यवर्ती भूमिकेबरोबरच महेश मांजरेकर यांची वेगळी आणि महत्त्वपूर्ण भूमिका यात असल्याने या सिनेमाबद्दल प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे. महेश मांजरेकर यांनी कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा विविधांगी भूमिकांमध्ये स्वतःला सिध्द केलं आहे.

“टेक केअर गुड नाईट’ची कथा हे तुमच्या आमच्या दैनंदिन आयुष्यात घडणारी आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाला सरावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात अशाप्रकारच्या सायबरशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्या मांडताना हा सिनेमा त्यावरील उपाय आणि बऱ्या-वाईट गोष्टींबद्दल भाष्यही करतो. हा सामाजिक संदर्भ ध्यानात घेवून मी या सिनेमात काम करायचे ठरवले. मी यात साकारलेली भूमिका ही फारच आव्हानात्मक आणि मी आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. सायबर गुन्ह्यांबद्दल एक वेगळाच दृष्टीकोन हा सिनेमा आपल्याला देऊन जातो,” असे महेश मांजरेकर म्हणतात.

अलीकडेच सायबर गुन्हेगारीमुळे एका बँकेच्या एटीएमवर परिणाम झाल्याच्या आणि ग्राहकांची पंचाईत झाल्याच्या बातम्या आल्या. “तंत्रज्ञानाधारीत जीवनशैलीमुळे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे असे प्रसंग येत असतात. 25 मधील एका नागरिकाला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. सायबर गुन्हेगारीचा फटका बसणारे 70 टक्के लोक हे उच्चशिक्षित तर उर्वरित 30 टक्केच कमी शिकलेले असतात, ही वस्तुस्थिती आहे. सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. सायबर क्राईम कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्ही यातून अनुभवू शकता. तंत्रज्ञानाचा वापर करताना काय करावे आणि काय करू नये, याचे नेमके भाष्य यात आहेत,” लेखक-दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी म्हणाले.

‘टेक केअर गुड नाईट’ हा गिरीश जयंत जोशी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 31ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive