सोनी मराठी या वाहिनीवर एक नवी फ्रेश मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.‘इयर डाउन’,असं या नवीन मालिकेचे नाव आहे. नुकताच या मालिकेचं लॉंच शानदार पध्दतीने पार पडलं. यावेळी मालिकेतील कलाकार आणि दिग्दर्शकांसह सोनी मराठीच्या संपूर्ण टीमनेसुध्दा हजेरी लावली होती.
जाहिरातींमधील ‘अटी आणि शर्ती लागू’ हे छोटे वाटणारे शब्द आपल्याला विचार करायला नेहमीच भाग पाडतात आणि एखादी शंकाही येते. हेच वाक्य जर एखाद्याच्या आयुष्याचाच भाग होत असेल तर...जनमेजय हा संपन्न कुटुंबातला मुलगा. पण वडिलांच्या मनाविरुद्ध म्हणजेच अटी आणि शर्तीविरुद्ध त्याने वायनरी टाकलीय...त्यामुळे तेढ आहे...आईनं त्याला सगळ्या बाबतीत पंखाखाली घेतलाय...
आज मोठा उद्योजक असला तरीही... इथे एक युवती जनमेजयच्या जीवनात येते...दोघेही प्रेमात पडतात....इथपर्यंत सगळं ठीक...लग्नालाही मुलीकडून होकार आहे...पण..आड येतात अटी आणि शर्ती...
मुलीच्या वडीलांची अट अशी की जनमेजयने अभियांत्रिकीची पदवी मिळवायला हवीच...सुरुवात महाविद्यालयातल्या प्रवेशापासून असली तरी पुढे आणखी किती अटी आणि शर्ती लागू होणार कुणास ठाऊक!
जनमेजयच्या भूमिकेतील अभिनेता संतोष जुवेकर आणि त्याची नायिका म्हणून नवोदित अभिनेत्री प्रणाली घोगरे पाहायला मिळणार आहे. तसंच अनेक सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन करणारे समीर पाटील यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
मुख्य म्हणजे सोनी वाहिनीची ही आग्रही ‘इयर डाउन’ मालिका बघायला कोणत्याही अटी आणि शर्ती लागू नाहीत.