By  
on  

बापरे! लव सोनियामध्ये सई ताम्हणकरची वजनदार कामगिरी

ब्लॅक अॅंड व्हाइट, गजनी आणि हंटर अशा बॉलीवूडपटांमधून दिसलेली सई ताम्हणकर आता लवकरच  तबरेज नुरानी दिग्दर्शित लव्ह सोनिया या इंडो-वेस्टर्न सिनेमामध्ये झळकणार आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेसोबत समरसून जाऊन सिनेमाला योग्य न्याय देणा-या सई ताम्हणकरने आपल्या या नव्या सिनेमासाठीही भरपूर मेहनत घेतली आहे.

लव सोनिया सिनेमातली अंजली वेश्याव्यवसायातली दलाल असते. अशा स्त्रीची भूमिका करताना सईला खूप तयारी करावी लागली. ती म्हणाली, “आजपर्यंत मी रंगवलेल्या भूमिकांपेक्षा अंजली खूपच वेगळी होती. अशा महिलांना मी कधीही भेटलेही नव्हते. त्यांची देहबोली आत्मसात करताना काही निरीक्षणं आणि संशोधनं केली. थोडा जास्त अभ्यास या भूमिकेसाठी करावा लागला. मला साडी नेसायची होती. या व्यवसायात असलेल्या स्त्रिया जेव्हा साडी नेसतात तेव्हा त्यांच्या देहबोलीचं दर्शन घडतं. आणि त्यातून त्यांचे जागरणं किंवा अवेळी जेवणाने वाढलेले वजन प्रकर्षाने दिसून येत असते, हे उमगले.”

सई पूढे सांगते, “कॉस्च्युम डिझाइनर शाहिद आमिर ह्यांनी ब्लाउज डिझाइन करताना ते मुद्दामहून मापाचे नसतील, किंवा ते थोडे जास्त मापाचे असतील असेच डिझाइन केले होते. आता मला माझे वजन वाढवणं गरजेचे होतं. वेट गेन करताना सुटलेले शरीर दिसणं आणि आकारमान बेढब असणं ह्यावर लक्ष केंद्रित केलं. लव्ह सोनियासाठी मी जवळ-जवळ 10 किलो वजन वाढवलं होतं.”

यापूर्वी सईने सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार या मराठी सिनेमासाठी आपलं वजन वाढवलं होतं. त्यात मध्यमवयीन गृहिणीच्या भूमिकेत सई दिसली होती.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive