काही दिवसांपासून अभिनेता हृतिकच्या फ्लर्टला वैतागून अभिनेत्री दिशा पटानी हिने एक बिग बजेट सिनेमावर पाणी सोडल्याचं वृत्त होतं. पण गंमत म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय. कोणीतरी मुद्दामून हृतिक आणि दिशाबद्दल या उलट-सुलट अफवा पसरवत असल्याचं आता समोर येऊ लागलं आहे. ‘बागी-2’ मध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर दिशा आता सलमानच्या ‘भारत’मध्ये झळकणार आहे.
प्रत्यक्षात मात्र दिशाला हृतिकसोबत काम करायचं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यशराज फिल्म्सने कोणत्याही बिग बजेट सिनेमासाठी दिशा पटानीला साईन केलेलं नाही. जर साईन केलं जरी असतं तर इतक्या मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी कोण कशी सोडेल, हाच प्रश्न उभा राहतोय. महत्तवाचं म्हणजे या बिग बजेट सिनेमात टायगर श्रॉफ आणि हृतिकसोबत दिशा झळकणार होती अशा चर्चा रंगल्या होत्या. दिशा आणि टायगर तर एकमेकांना डेट करतात असं बोललं जातं, मग टायगरसोबतचा सिनेमा तर ती नाकारण्याची शक्यता फारच कमी आहे.
हृतिकने सोशल मिडीयाचा आधार घेत या दिशा प्रकरणाच्या अफवांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. तर सूत्रांनुसार दिशाने या खोट्या अफवा असल्याचे म्हणत या वृत्ताची टिंगल करत सुपरस्टार हृतिकसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दिशा म्हणते, “काहीतरी फारच वायफळ आणि निरर्थक चर्चा माझ्या आणि हृतिक सरांबाबत पसरवल्या जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या चर्चा साफ खोट्या असून मी आणि ते फारच कमीवेळा एकमेकांना भेटलो आहोत. ते खुप मस्त आणि आनंदी व्यक्ती आहेत.”
दिशा पुढे सांगते, “हृतिक सरांसारख्या अभिनेत्याबरोबर काम करण्यास कोण कसा नकार देईल. मी त्यांच्यासोबत काम करणार नसल्याच्या वृत्तात काहीच तथ्य नाही.”
दरम्यान सलमानसोबत भारतमध्ये झळकणारी दिशा ट्रॅपिझ आर्टिस्टची भूमिका साकारते आहे. या भूमिकेसाठी दिशा विशेष प्रशिक्षणसुध्दा घेत आहे.