By  
on  

स्पृहा जोशी आणि अभिजित खांडकेकर ही जोडी 'बाबा'निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकणार

प्रख्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी  निर्मिती असलेल्या ‘बाबा’ सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या सिनेमातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. सिनेमात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच नाटक, सिनेमा आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली अभिनेत्री स्पृहा जोशी आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील गुरु म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर ‘संजय दत्त प्रॉडक्शन्स’ आणि ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ निर्मित ‘बाबा’ या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.

स्पृहा जोशी ही ‘पल्लवी’ आणि अभिजीत खांडकेकर हा ‘राजन’ नावाची व्यक्तिरेखा साकारत असून या सिनेमात दोघेजण नवराबायको बनले आहेत. या सिनेमातील अभिजीत आणि स्पृहा या दोघांनी एकत्र केलेले काम आणि त्यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग आतुर झाला आहे. ‘भावनेला भाषा नसते’,हा सरळसाधा संदेश ‘बाबा’ सिनेमा देतो.

 

अभिजित बरोबर काम करण्याविषयी स्पृहा जोशी म्हणाली की ‘मी आणि अभिजीत मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र येत आहोत. आम्ही दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत आहोत. अभिजीत आणि मी चांगले मित्र आहोत, पण आम्ही याआधी कधीच एकत्र काम केले नव्हते. ‘बाबा’च्या माध्यमातून ती संधी चालून आली, याचा मला आनंद आहे. ‘बाबा’ ही नात्यांमधील बंधाची एक सुरेख कथा आहे. आम्हा दोघांमधील केमिस्ट्रीचा प्रश्नच उद्भवला नाही, कारण आम्ही एकमेकांना खूपच चांगले ओळखतो’.

अभिजीत खांडकेकर स्वतःच्या भूमिकेबद्दल म्हणाला की ‘या सिनेमात माझा लुक अगदीच वेगळा आहे. बेल बॉटम पँट तसेच चौकोनी आकाराची चष्म्याची फ्रेम या सर्व गोष्टी या व्यक्तिरेखेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना मला खूपच मजा आली. स्पृहा जोशी माझी चांगली मैत्रीण आहे तसेच मी तिला खूप वर्षापासून ओळखतो. पण तिच्याबरोबर मी कधीच काम केले नव्हते, मला या सिनेमाच्या माध्यमातून ही संधी मिळाली याचा मला आनंद आहे’.

‘बाबा’मध्ये ‘तनु वेडस मनू’ आणि ‘हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. तो या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्याबरोबर नंदिता पाटकर प्रमुख भूमिकेत आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. याआधी त्यांनी ‘धागा’ या झी5 वर प्रदर्शित झालेल्या मराठी लघुपटाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे. हा सिनेमा २ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive