दिपक दोब्रीयाल हा कलाकार 'बाबा' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. दिपक दोब्रीयाल हे नाव प्रेक्षकांना नवं नाही. दिपकने ‘तनु वेडस मनू’, ‘हिंदी मिडीयम’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘बाबा’ हा त्यांच्यासाठी अत्यंत वेगळा आणि समाधान देणारा चित्रपट ठरला. ते म्हणतात की, ''त्यांची बारा वर्षांची सिनेमा कारकीर्द एका बाजूला आणि हा सिनेमा एका बाजूला! त्यांच्या दहा हिंदी सिनेमांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे समाधान त्यांना या एका सिनेमाने दिले'', असेही दोब्रीयाल ठासून सांगतात.
दीपक दोब्रियाल हे राज आर गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करत आहेत. या सिनेमाची संयुक्त निर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्स आणि ब्ल्यु मस्टँग क्रिएशन्सने केली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आपल्या प्रवेशाबाबत आनंद व्यक्त करताना दीपक दोब्रियाल म्हणतात, “इथे मला एवढे प्रेम मिळाले कि, मी मराठी सिनेमात काम करत आहे असे मला वाटलेच नाही. जेथे भरभरून सर्जनशील काम होते अशा एका सिनेसृष्टीत काम करण्याचा करण्याची संधी मला मिळते आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मराठीतील सिनेमे पाहिल्यावर या सिनेसृष्टीचे वेगळेपण लक्षात येते.”
दोब्रियाल म्हणतात की, या सिनेमाने त्यांना त्यांच्या आयुष्यातही बदल घडवून आणण्यास मदत केली आहे. “या सिनेमाने माझ्या आयुष्याचा अर्थच बदलला आहे. सामाजिक संदेशांबद्दलच्या माझ्या जाणिवा अधिक जागृत झाल्या. 'बाबा'ने मला समृद्ध तर केलेच पण तो इतर सिनेमांपेक्षा वेगळा आहे हेसुद्धा सिद्ध केले. ‘बाबा’ करत असताना हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे, असे कधीच वाटले नाही.”
‘बाबा’ हा सिनेमा २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटाबद्दल बोलताना दोब्रीयाल म्हणाले, “माझ्या बारा वर्षांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे संचित मी ‘बाबा’मधून कमावले आहे. मी आतापर्यंत जे हिंदी सिनेमे केले त्या सर्व सिनेमांच्या तुलनेत हा सिनेमा सरस आहे. 'बाबा'ने मला पुनर्जन्म दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सर्वच गोष्टींसाठी मी मराठी सिनेसृष्टीचा नेहमीच ऋणी राहीन.
या सिनेमात दीपक दोब्रियाल यांच्या व्यतिरिक्त नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे. या सिनेमाची कथा मनिष सिंग यांनी लिहिली आहे.दोब्रीयाल यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी संस्कृतीबद्दलही गौरवोद्गार काढले आहेत. 'बाबा' हा सिनेमा २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.