‘लव सोनिया’या तबरेज नुरानी दिग्दर्शित आंतरराष्ट्रीय सिनेमामध्ये मराठमोळी सई ताम्हणकर झळकणार आहे. येत्या 14 सप्टेंबरला रिलीज होणा-या ह्या सिनेमामध्ये वेश्याव्यवसायातल्या अंजली ह्या भूमिकेत सई पाहायला मिळेल. सईला देहविक्रीच्या व्यवसायाविषयी चित्रीकरणाआधी बराच अभ्यास करावा लागला.
लव सोनिया सिनेमातील भूमिकेच्या अभ्यासाविषयी सई ताम्हणकर सांगते, “आपण कळत्या वयापासून ह्या व्यवसायाविषयी कितीही ऐकलं असलं तरी, माझ्यासारखी मध्यमवर्गीय सुखवस्तू घरात लहानाची मोठी झालेली व्यक्ती जेव्हा वेश्यावस्तीत पहिल्यांदा पाऊल ठेवते. तेव्हा पहिल्याच दिवशी मनाला लागणारा चटका शब्दात न सांगण्याजोगा आहे. दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत पाच-पाच माणसं कशी राहतात, कशा अवस्थेत आणि वातावरणात देहविक्रयाचा व्यापार होतो. हे जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा आपल्या मध्यमवर्गीय आयुष्यातली दु:खच तुम्ही विसरून जाता.”
सई पुढे स्पष्ट करते, “चोरुन आणलेल्या मुलांना इथे एका छोट्या पिंज-यात ठेवलं जातं. त्यांच्याकडून मजूरी करवून घेतली जाते. भीक मागितली जाते, मुलींना जबरदस्तीने देहविक्रीच्या धंद्यात ढकलंल जातं. अशावेळी त्यांच्या मनावर काय परिणाम होत असतात, त्याची कल्पनाही सामान्यांना नसते.”
सई आपल्या अनुभवांबाबत थोडीशी भावूक होत सांगते,“असे अनेक धक्कादायक अनुभव मला आले. आणि त्यामूळे आता माझी गाडी कोणत्याही सिग्नलला थांबली की, समोरून भीक मागायला आलेल्या किंवा काही वस्तू विकायला आलेल्या मुलांची मी पहिल्यांदा चौकशी करते. त्यांनी दिवसभरात काही खाल्लं आहे का? ते शाळेत जातात का? ह्याविषयी कुतूहलाने विचारते. त्यांच्याबद्दल मला आता फार आत्मियता वाटू लागली आहे. अधिक सजग नागरिक बनवण्याचं काम लव सोनिया सिनेमाने माझ्यासाठी केलं आहे.”