परदेशातील नयनरम्य आणि मनमोहक स्थळांवरील चकचकीत सीन्स, त्याच सुंदर ठिकाणांवर चित्रित करण्यात आलेली गाणी म्हटलं की ही मक्तेदारी फक्त बॉलिवूडचीच असं नेहमी बोललं जातं. पण मराठी सिनेमासुध्दा आता यात मागे नाही. मराठी सिनेसृष्टीसुध्दा बॉलिवूडची ही मक्तेदारी मोडू पाहते आहे, कशी...चला तर जाणून घेऊयात.
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एक राधा एक मीरा’ हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेसृष्टीतील हॅण्डसम हंक हिरो म्हणून ओळखला जाणारा गश्मीर महाजनी या सिनेमाचा नायक असून नायिका म्हणून गुणी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे झळकणार आहे. या दोघांसोबतच नवोदित अभिनेत्री सुरभी भोसले या सिनेमाद्वारे पदार्पण करतेय.
https://www.youtube.com/watch?v=UJc04xDuojw
एक राधा एक मीरा सिनेमाचं खासं वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा संपूर्णपणे परदेशात चित्रित करण्यात आला आहे. ट्रेलर पाहताच त्रिकोणी प्रेमकथा किंवा नायकाची दुहेरी व्यक्तिरेखा असलेल्याचा अंदाज बांधता येतोय. हा एक प्रेमकथेवर आधारित संपूर्ण ड्रामा आहे, एवढं मात्र नक्की. महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनीसुध्दा या सिनेमा महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
महेश मांजरेकर यांनीच दिग्दर्शनासोबतच सिनेमाची प्रस्तुतीसुध्दा केली आहे. अविनाश कुमार अहल्ये यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. अनोखी प्रेमकथा असलेला ‘एक राधा एक मीरा’हा सिनेमा 23 नोव्हेंबर 2018 रोजी प्रदर्शित होणार असून सर्वांनाच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.