सध्या नव्या विचारांचे, शैलीचे युवा दिग्दर्शक आपापल्या कलाकृती घेऊन येत आहेत. वेगळ्या वाटेने जाऊ पाहणाऱ्या या दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे आदित्य मोहिते. गेली तीन वर्षे हॉलीवूडमध्ये दिग्दर्शक व कलादिग्दर्शक म्हणून कार्यरत असणाऱ्या आदित्य यांची नाळ महाराष्ट्राशी जोडलेली आहे. वास्तूविशारद असलेले आदित्य पुण्यात वास्तव्यास होते. लहानपणापासून कलेची आवड असणाऱ्या आदित्य यांना कॅमेराच्या माध्यमातून आपल्या मनातल्या कथा अधिक प्रभावीपणे सांगता येऊ शकतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी अमेरिका गाठली आणि लॉस एंजलिस येथे फिल्ममेकिंगचं रीतसर प्रशिक्षण घेतलं.
हॉलीवूडच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध टिव्ही शोज, नाटयकृती, जाहिरातपट, लघुपट यांची निर्मिती केली. 2016 मध्ये ‘असेश ऑफ गोल्ड’ (Ashes Of Gold) या लघुपटाचे दिग्दर्शन त्यानी केले. त्यानंतर आता दोन भावांच्या नातेसंबधांवर आधारलेला फ्रेंच संस्कृतीचा ‘क्नेड फॉर लव्ह’ (Knead For Love) हा लघुपट ही रसिकांच्या भेटीला आणला आहे. ‘क्नेड फॉर लव्ह’ या लघुपटाचा गौरव अनेक आंतराष्ट्रीय महोत्सवांमध्ये झाला असून 2018 च्या कान्स महोत्सवाच्या लघुपट विभागातही या चित्रपटाचे जोरदार स्वागत झाले आहे. आदित्य यांच्या या दोन्ही लघुपटांची खासियत म्हणजे ‘वॉर्नर ब्रदर्स’ च्या अद्ययावत स्टुडिओमध्ये या सिनेमाचे प्रिमीयर संपन्न झाले. सिनेमातील रंजकता हेच यशाचे गणित असून कौटुंबिक आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर आधारित वास्तववादी घडामोडींवर देखील सुंदर सिनेमा होऊ शकतात हे आदित्य यांनी दाखवून दिले आहे.
प्रवास हा प्रत्येकाला अनेक गोष्टी शिकवत असतो. सततच्या प्रवासामुळे मला माझ्या प्रत्येक सिनेमाच्या कथा त्यातील माणसं भेटली आहेत. दिग्दर्शक म्हणून तुम्ही चांगला सिनेमा देणं महत्त्वाचं. नफ्या-तोटय़ाचं गणित हे त्यानंतर येतं असं मानणाऱ्या आदित्य यांच्या मते चांगला सिनेमा बनविणे हे दिग्दर्शकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
हॉलीवूडमध्ये कलादिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझायनिंगचा देखील अनुभव असणाऱ्या आदित्य यांना सिनेमाच्या वेगळ्या दुनियेची सफर प्रेक्षकांना घडवायची आहे. आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी हा प्रयत्न केला असून आपल्या आगामी कलाकृतीमधूनही हे वेगळेपण जपण्याचा त्यांचा मानस आहे. हॉलीवूडमध्ये आपल्या कलेची किमया दाखवणाऱ्या आदित्य यांना भविष्यात मराठी सिनेमाचे दिग्दर्शन करण्याचा मानस आहे.