कर्करोगावर जिद्दीने मात करुन पुन्हा उभे राहणारे तसे विरळाच. असाच एका जिद्दीचा प्रवास आपल्या मराठी सिनेसृष्टीतल्या चतुरस्त्र अभिनेते अशी ओळख असलेले शरद पोंक्षे यांनी नुकताच पूर्ण केला आणि आता वसंत कानिटकर लिखीत व राजेश देशपांडे दिग्दर्शित हिमालयाची सावली नाटकातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यांच्या ह्या जिद्दीला सलाम ठोकत एक अभिमानास्पद पोस्ट अभिनेता सुबोध भावेने केली आहे.
सुबोध भावे म्हणतो, " शरद पोंक्षे तुझ्या जिद्दीला सलाम. या नाटकाद्वारे तुझं तुझ्या आवडत्या रंगभूमीवर पुन्हा एकदा पदार्पण होतंय. तुला आणि या नाटकाशी संबंधित सर्व रंगकर्मींना माझ्या खूप खूप शुभेच्छा "
‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीने सजलेल्या आणि डॉ. श्रीराम लागू ,शांता जोग, अशोक सराफ या कलाकारांच्या उत्तम अभिनयाच्या अदाकारीने गाजलेल्या ‘हिमालयाची सावली' या दर्जेदार अभिजात नाट्यकलाकृतीचा आस्वाद नाट्यरसिकांना लवकरच घेता येणार आहे. आजवर अनेक सकस अशा नाट्यकलाकृती प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकाचे शिवधनुष्य पेलले आहे. तब्बल ४० वर्षांनी रंगभूमीवर येणारे हे नाटक सर्व रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस निर्माता व दिग्दर्शकांचा आहे.
अभिनेते शरद पोंक्षे हे श्रीराम लागू यांनी केलेली नानासाहेबांची भूमिका साकारणार असून त्यांच्यासोबत शृजा प्रभूदेसाई, जयंत घाटे, विघ्नेश जोशी, कपिल रेडकर, मीनल बाळ, कृष्णा राजशेखर आदि कलाकार या नाटकामध्ये दिसणार आहेत. संगीताची जबाबदारी राहुल रानडे तर कलादिग्दर्शन संदेश बेंद्रे यांचे असणार आहे. वेशभूषा मंगला केंकरे यांची आहे. निर्मिती सूत्रधार सुभाष रेडेकर आहेत. अंजली व अंशुमन कानेटकर यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे.
एका व्रतस्थ समाज कार्यकर्त्याच्या पत्नीला कशाप्रकारे अवघं आयुष्य जगावं लागतं अशा आशयाचं हे नाटक जुन्या-नव्या पिढीसाठी ही नाटय़ मेजवानी ठरेल यात कुठलीच शंका नाही.