By  
on  

सोनी मराठीवर पाहा उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा

सर्वत्र गणरायाचं जल्लोषात आगमन होत आहे. म्हणूनच सोनी मराठीच्या ‘उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा’या पहिल्यावहिल्या कार्यक्रमात प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी या कलाकारांनीसुध्दा विघ्नहर्त्याच्या साक्षीने या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर नम्रता आवटे–संभेराव, समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर यांनी या हास्यजत्रेत जबरदस्त रंग भरले. तर या कार्यक्रमाला चार चांद लावले आनंद शिंदे यांच्या गायकीनी. आपल्या रांगड्या आवाजात सादर केलेल्या सदाबहार गीतांनी त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर ‘वस्त्रहरण’ नाटकाचा सादर झालेला अंश प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला, तर सोनी मराठीवर सध्या गाजत असलेली मालिका ‘ह्रदयात वाजे समथिंग’ याचे कलाकार निखील दामले, स्नेहा चव्हाण आणि ऐश्वर्या पवार यांनी सादर केलेला नृत्याविष्कार पाहून प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठोका मात्र नक्कीच चुकला.

‘नाद करायचा नाय’म्हणत संतोष जुवेकर याने एकच कल्ला केला. त्यानंतर संतोष जुवेकर सोबत ’इयर डाऊन’या सोनी मराठीवरील मालिकेतील प्रणाली घोगरेने सुंदर नृत्य सादर केलं आणि याच कार्यक्रमाची थेट झलक प्रेक्षकांसमोर सादर झाली.
हास्याचा विस्फोट होत असतानाच रंगमंचावर अचानक भरत जाधव यांच्या रूपात ‘मोरूची मावशी’ अवतरली आणि प्रेक्षकांचे डोळे पाणावले. ‘हास्यजत्रा’ भरलेली असताना मोरूच्या मावशीची आठवण न काढणं शक्यच नव्हतं. विजय चव्हाण.... एक असा कलाकार ज्यानी आपलं आयुष्य प्रेक्षकांना हसवण्यात घालवलं अशा सच्च्या कलाकाराच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन निघू शकणार नाही, याची जाणीव झाली. भरत जाधव यांनी ‘टांग टिंग टिंगाक’... करत विजय चव्हाण यांना आदरांजली वाहिली.


सोनी मराठीवर 'उत्सव गणरायाचा, महोत्सव हास्यजत्रेचा' हा कार्यक्रम येत्या 19 आणि 20 सप्टेंबर रोजी रात्री 9.00 वाजता प्रसारित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive