By  
on  

‘पाटील’ सिनेमाचा शानदार म्युझिक लॉंच सोहळा

समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या सिनेमांना प्रेक्षकांनी नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या ‘पाटील’ या मराठी सिनेमाचा म्युझिक लॉंच नुकताच महाराष्ट्राचे महसूल, मदत-पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी श्री.श्रीकांत भारतीय (मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी), आमदार प्रसाद लाड, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रामराव वडकुते, कोकण आयुक्त डॉ.जगदीश पाटील, स्वाती खोपकर, पांडुरंग लोलगे, रुपेश टाक, सतीश गोविंदवार, अचर्ना लोलगे, जयशील मिजगर आदि मान्यवर उपस्थित होते. दिग्दर्शक संतोष राममीना मिजगर यांच्या आजवरच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ‘पाटील’ सिनेमाला चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

मनोरंजक मूल्यांचा समावेश करत ‘पाटील’ सिनेमातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. सिनेमात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘पाटील पाटील’ हे धडाकेबाज गाणं आनंद शिंदे, आदर्श शिंदे  यांनी गायलं असून ‘तुला पाहून’ हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुललं आहे. ‘सूर्य थांबला’ या मनस्पर्शी  गीताला  सुखविंदर सिंग व रेहा  विवेक यांचा स्वर लाभला आहे. ‘राधेला पाहून’ व ‘धिन ताक धिन’ या ठेका धरायला लावणाऱ्या गीतांना गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांनी स्वरबद्ध केलं आहे. सिनेमाची गीते गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी,एस.आर.एम.एलियन यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. ‘पाटील’ सिनेमाचे ध्वनीफित ‘झी म्युझिक’ने प्रकाशित केली आहे.

या सिनेमात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्रदेशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे एस.आर.एम एलियन, यश आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ.जगदीश पाटील (कोकण आयुक्त) दिसणार आहेत.

कथा,पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. बॉलीवूड टुरिझम आणि‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या  सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तेजल शहा, नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे,  रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे,  शिवाजी कांबळे, सुधीर पाटील, सौरभ तांडेल,  विजय जैन, जेनील शाह, सोमनाथ दिंगबर, हाजी पटेल, दिपक दलाल सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत.

स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ हा सिनेमा येत्या 26 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive