सध्या मालिकांमधील नायिकांबरोबरच त्यांच्या आईसुध्दा तितक्याच लोकप्रिय होताना दिसतात. होणार सूनमधील जान्हवीच्या आईनंतर आता छोट्या पडद्यावर एका नवीन आईची चर्चा रंगलीय, ती म्हणजे तुला पाहते रे मधील ईशा निमकरची आई. अल्पावधीच तुला पाहते रे मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आणि या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा घराघरांत पोहचल्या.
सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार यांच्यातील तुफान केमिस्ट्रीमुळे तुला पाहते रे ही प्रेक्षकांची लाडकी मालिका ठरलीय. यात एक व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेते ती म्हणजे ईशाच्या आईची. ईशाची आई ही अगदी टिप्पीकल अशी मध्यमवर्गीय चाळीतील खोलीत राहणारी स्त्री. आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळावं ही तिची मनापासून इच्छा आहे. ती सुखात राहावी अशी, ती प्रत्येक आईप्रमाणे भाबडी आशा बाळगून आहे. पण ईशाची आई साकारणारी ही अभिनेत्री आहे,कोण तुम्हाला माहितीय का?
मध्यमवर्गीय आणि उपवर मुलीची आई साकारणारी सौ.निमकर आहे, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द आणि दिग्गज अभिनेते निळू फुले यांची लाडकी लेक गार्गी फुले-थत्ते. त्यामुळे साहजिकच अभिनयाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला आहे. ईशाची आई अगदी आपल्या आई सारखीच वाटते. साधी-सरळ लहान-लहान गोष्टींवरुन ओरडणारी त्यामुळे अल्पावधीतच गार्गी यांनी साकारलेली ही भूमिका प्रचंड गाजतेय.