बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या महत्त्वकांक्षी आणि बहुचर्चित ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक सिनेमात मराठमोळे अभिनेते अजिंक्य देव यांची वर्णी लागली आहे. ‘लोकमान्य एक युगपुरुष’ फेम दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
खुद्द अजिंक्य देव यांनीच आपल्या ट्विटरवरुन तानाजी सिनेमात आपण भूमिका साकारत असल्याची माहिती दिली. अजिंक्य देव यांनी म्हटलंय, माझं तानाजी सिनेमातील पहिल्या दिवसाचं शूटींग पूर्ण झालं आहे. ओम राऊत आणि त्याच्या अप्रतिम टीमसोबत काम करताना खुप मजा येतेय.
https://twitter.com/Ajinkyad/status/1044638932951072768
महत्त्वाचं म्हणजे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणा-या शिवाजी महाराजांना या संघर्षात अनेक शिलेदारांची मोलाची साथ लाभली. त्यापैकी शूरवीर योध्दे तानाजी मालुसरे यांचा सिंहाचा वाटा होता.‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजी मालुसरे यांच्या तडफदार भूमिकेत खुद्द अजय देवगणलाच पाहायला मिळणार आहे. तर या बिग बजेट सिनेमात बॉलिवूडमधील अनेक बडे कलाकारसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याची एक जबरदस्त चर्चा रंगलीय.
पण या महाराष्ट्राची पार्श्वभूमी असलेल्या सिनेमात कोणते मराठी कलाकार भूमिका साकारणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. आता अजिंक्य देव यांच्यानंतर आणखी कोणते मराठी कालाकार यात झळकणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.