तनुश्री दत्ताने अभिनयसम्राट नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपांचा फटका आता त्यांच्या सिनेकारकिर्दीला चांगालच बसू लागला आहे. हाऊसफुल ४ सिनेमावर पाणी सोडावं लागल्यानंतर ज्या नानांच्या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, तो नटसम्राट रंगभूमीवर पुन्हा जीवंत होत आहे. पण ही नटसम्राट अप्पा बेलवलकरांची भूमिका रंगभूमीवर आता नाना पाटेकर नाही ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारणार आहेत.
“कुणी घर देता का घर”? अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या, आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’. विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या विविध शोकांतिकांवरून प्रेरित होऊन अशीच एक शोकांतिका मराठीत नाट्यरूपात लिहिली वि. वा. शिरवाडकर यांनी. सत्तरच्या दशकात हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचत अभिनयाचा एक मोठा मापदंड निर्माण केला.
प्रत्येक मराठी रसिकाच्या मनावर या नाटकाचं गारूड आजही कायम आहे. हेच नाटक रूपेरी पडद्यावर भव्य रूपात प्रेक्षकांसमोर आणलं ‘नटसम्राट’ या सिनेमाटच्या माध्यमातून. अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली. प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारं हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. मात्र यावेळी रंगभूमीवर मोहन जोशी ‘नटसम्राट’चं आव्हान पेलणार आहेत. यंदा दिवाळीतच हे नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे.
हॅम्लेट, अलबत्या गलबत्या या नाटकांच्या यशानंतर झी मराठी ‘नटसम्राट’ हे नाटक रंगमंचावर आणत आहे. या नाटकात गणपतरावांची भूमिका मोहन जोशी तर कावेरीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असतील. बऱ्याच वर्षांनी हे दोघं रंगभूमीवर आले असून हरहुन्नरी अभिनेता ऋषीकेश जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत.