उर्मिला आणि मोहसिन अख्तरच्या ‘माधुरी’चं नवीन पोस्टर, या नवोदित अभिनेत्रीला मिळाली संधी

By  
on  

 नुकतेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आणि तिचे पती मोहसिन अख्तर यांनी त्यांच्या ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’तर्फे ‘माधुरी’ या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केली होती. ‘माधुरी’ या सिनेमात मराठीतील प्रतिभावान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिका साकारणार आहे. सोनाली कुलकर्णीने एकापेक्षा एक अप्रतिम भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे, त्यामुळेच ‘माधुरी’मधील सोनाली कुलकर्णींची भूमिका पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.

एका अनमोल आणि सुंदर नात्यावर गुंफलेल्या ‘माधुरी’ सिनेमात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता शरद केळकर देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. हँडसम हंक असलेला शरद यावेळी मात्र कधीही न पाहिलेल्या एका नवीन रुपातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली आणि शरद यांच्यासोबतीला मोठ्या पडद्यावर  प्रेक्षकांना एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे.

निर्माते मोहसिन अख्तर यांनी ‘माधुरी’ या सिनेमातून एका नव्या चेह-याला त्यांचे अभिनय कौशल्य दाखवून देण्याची संधी दिली आहे आणि तो नवा चेहरा म्हणजे संहिता जोशी. विशेष म्हणजे या सिनेमातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी संहिताची निवड करण्यात आली.

‘माधुरी’ सिनेमातील नवीन चेह-यासाठी संहिता जोशीची निवड करण्यासंबंधी निर्माते मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, “‘माधुरी’ सिनेमाचे लेखक शिरीष लाटकर यांनी मला एक शॉर्ट फिल्म दाखवली आणि त्या शॉर्ट फिल्ममध्ये संहिताचा परफॉर्मन्स मी पाहिला आणि तिचा अभिनय पाहता क्षणीच ठरवलं की मी संहिताची माझ्या ‘माधुरी’ सिनेमासाठी निवड करणार. खरं तर संहिताने साकारलेली भूमिका कोणत्याही नवीन कलाकारासाठी अवघड होती पण मला विश्वास होता की संहिता ही भूमिका चांगली करु शकते. आणि आता मला खात्री आहे की संहिता ही मराठी सिनेसृष्टीत मोठं नाव कमवेल.”

मराठी सिनेमाविषयी असलेली आवड जोपासत मोहसिन अख्तर निर्मित ‘माधुरी’ या सिनेमाची सुंदर कथा आणि कलाकारांचा सुंदर अभिनय येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share