बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मालकीची एखादा खेळाडू संघ असणे, आता नाविन्याचे राहिले नाही, शाहरूख खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी ह्या बॉलीवूड स्टार्सच्या आयपीएलमध्ये स्वत:च्या टीम आहेत. तर अभिषेक बच्चनकडे कब्बडी टीम आहे, मात्र आता पहिल्यांदाच एका मराठी सुपरस्टारच्या मालकीचाही खेळाडूंचा संघ असणार आहे आणि ती अभिनेत्री आहे, अर्थातच सई ताम्हणकर.
महाराष्ट्र कुस्ती दंगल ह्या कुस्ती लीगमध्ये सई ताम्हणकरने ‘कोल्हापूर मावळे’ ही टीम विकत घेतली आहे. ह्यामुळे आता सई ताम्हणकर अशी एकुलती एक मराठी अभिनेत्री असेल, जिच्याकडे एखादी स्पोर्ट्स टीम आहे.
सूत्रांच्या अनुसार, सई ताम्हणकर नेहमीच काहीतरी वेगळ करण्याचा विचार करते.तिच्या ह्या पठडीमोडित काढत, रूढिबध्द नसलेल्या विचारसरणीमूळेच तिने अनेक मोठ-मोठे मानमरातब आजपर्यंत मिळवलेले आहेत. ती मराठी सिनेसृष्टीला लाभलेली ग्लोबल स्टार आहे. आणि तिने एक कुस्ती टीम खरेदी केल्याने आता कुस्तीलाही ग्लॅमर लाभेल, हे निश्चित.
सई ताम्हणकर ह्याविषयी सांगते, “मी मुळची सांगलीची. त्यामूळे कोल्हापूरच्या कुस्तीच्या परंपरेशी मी अवगत आहे, पहलवानांची जीवनशैली, कोणत्या डावाला काय म्हणतात, किंवा कोणता डाव कधी टाकावा ह्याचे चांगले ज्ञान आहे. पण हे ज्ञान कधी ना कधी अशा पध्दतीने उपयोगाला येईल, असं कधीच वाटलं नव्हतं. माझी परिस्थिती नसल्याने मला चांगला व्यासपीठ मिळू शकले नाही, असं कोणताही कुस्तीपटू किंवा कोणत्याही खेळाडूने ह्यापूढे बोलू नये, हाच माझा ही टीम खरेदी करण्यामागे उद्देश आहे.”
https://twitter.com/SaieTamhankar/status/1053313099359412225
सई ताम्हणकर पूढे म्हणते, “ह्या कुस्ती लीगमध्ये असलेल्या टीमओनर्समध्ये मी एकुलती एक महिला टीमओनर असल्याचा मला अभिमान आहे. आपल्या मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं, यासाठी माझा प्रयत्न असेल.”