छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातील पहिल्या लोकाभिमुख स्वराज्याची स्थापना केली. शून्यातून स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मर्द मावळ्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा.
संभाजी महाराजांबद्दल आजवर अनेकदा इतिहासकारांकडून, बखरकारांकडून अनेक कथा रंगवल्या गेल्या आहेत. पण त्या सगळ्या गोष्टींमागचा इतिहास लोकांसमोर आणण्याच काम झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मलिका यशस्वी प्रयत्न करत आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून शंतनू मोघे आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतून डॉ. अमोल कोल्हे यांनी या दोन्ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारल्या आहेत. प्रेक्षकांचा ही या मालिकेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
संभाजी महाराजांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग आता या मालिकेतून आपल्यासमोर येणार आहे. दिलेरखानाच्या छावणीतून निघाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या पितापुत्रांची भेट पन्हाळगडावर घडली होती. त्या दोघांच्याच आयुष्यातील नव्हे तर शिवकालीन इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून या भेटीचा उल्लेख केला जातो. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील ही शेवटची भेट असल्याने ती जेवढी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची होती तेवढीच भावनिक दृष्ट्याही महत्त्वाची होती. लवकरच ही ऐतिहासिक घटना आपल्याला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1054039700795609088
या भेटीत शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यात काय चर्चा होणार? सोयराबाई संभाजी महाराजांना स्वीकारणार का? यापुढे दिल्ली आणि रायगडावरच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळणार? आनाजी दत्तोंची या सगळ्यात काय भूमिका असेल? हे सगळं जाणून घ्यायचं असेल आणि पन्हाळगडावरील या ऐतिहासिक भेटीचे साक्षीदार व्हायचे असेल तर मंगळवार २३ ऑक्टोबर ते शनिवार २७ ऑक्टोबर या काळातील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचा एक ही भाग चुकवू नका.