मुंबई ही मायानगरी आहे. प्रत्येक जण या मुंबापुरीत उराशी एक स्वप्न बाळगूनच येतो. प्रत्येकाला मुंबईत आपलं एक स्वत:चं हक्काचं घर असावं ही एक भाबडी आशा असते. अभिनयाचं स्वप्न घेऊन मुंबईत येणा-या कलाकार मंडळींचंसुध्दा असंच असतं. संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणा-या आणि हसताय ना...हसायलाच पाहिजे म्हणत सगळीकडे फक्त आनंदच देणा-या डॉ. निलेश साबळे यांच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण नुकताच आला आहे. त्यांनी मुंबईत स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं आहे.
चला हवा येऊ द्या परिवाराचा सदस्य आणि निलेश साबळे यांचा मित्र कुशल बद्रिके याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही माहिती दिली. निलेश साबळे आणि त्यांच्या पत्नी गौरी यांच्यासोबतचा फोटो कुशलने शेअर केला आहे. यावेळी त्याची पत्नीसुध्दा होती.
कधी काळी पनवेलच्या बस स्टॉपवर रात्र काढलेल्या मित्राचं मुंबईत स्वत:चं घर झाल्याचा कुशलला अतिशय आनंद झाला आहे.
कुशल म्हणतो, "काही वर्षांपुर्वी पनवेल च्या बस स्टाॅपवर रात्र काढणार्या मित्राला त्याच्या मुंबईल्या स्वता:च्या घरा साठी खुप खुप शुभेच्छा .Dr. तुझं अभिनंदन . आणी जिच्याशिवाय हे शक्य झालं नसतं त्या गौरीच खरं कौतुक."
डॉ. निलेश साबळे हे मुळचे पुण्यातील सासवडचे असून त्यांनी रिएलिटी शोमध्ये भाग घेऊन स्वत:चं नाव कमावलं.