‘देऊळ बंद’ या सिनेमाचे दिग्दर्शन करणारे प्रविण तरडे आगामी ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणा-या ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमामुळे रविवारी प्रविण तरडे यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे ते दुपारी या कार्यालयात बसले असताना चार ते पाच अज्ञातांनी अचानक हल्ला चढवत त्यांना मारहाण व धक्काबुक्की केली.
सिनेदिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या पौड येथील कार्यालयात ही घटना घडली. दरम्यान, तरडे यांनी मात्र आपल्याला कोणतीही मारहाण झाली नसून केवळ किरकोळ धक्काबुक्कीचा प्रसंग घडल्याचे सांगितले आहे. आपल्या कार्यालात काही इसमांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं. त्यासोबतच आपल्याला कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आलेली नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. बऱ्याच ठिकाणी आपल्याला मारहाण झाल्याचं वृत्त चर्चेत असल्यामुळेच त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत अफवांना पूर्णविराम दिला आहे.
प्रविण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा बरेच दिवस चर्चेत आहे. गुन्हेगारी विश्वावर आधारित असल्याने याबाबत अनेक चर्चांना पेव फुटले आहे. पण या सिनेमात फक्त शेतक-यांच्या व्यथा मांडण्यात आल्याचे तरडे सांगतात.
मात्र या घटनेनंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली असून याची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी पोहचले असून आधिक तपास करण्यात येत आहे.