सुप्रसिद्ध मराठी विनोदवीर भाऊ कदम यांचा आगामी सिनेमा 'नशीबवान' हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल हा सिनेमा प्रस्तुत करत आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स निर्मित, गिरी मीडिया फॅक्टरी यांच्या सहयोगाने, आणि अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमातील 'ब्लडी फुल जिया रे' हे गाणं नुकतेच रिलीज झाले. उडत्या चालीचं असणार हे गाणं आनंद शिंदे यांनी स्वरबद्ध केले असून सोहम पाठक यांनी या गाण्याला संगीत दिले तर शिवकुमार ढाले यांनी हे गाणं लिहिले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन विठ्ठल पाटील यांनी केले आहे.
गाणं दिसताना जितके रंजक, ऐकताना जितके मजेदार वाटत आहे तितकीच मेहनत गाणं चित्रित करताना झाली. कारण या गाण्याचे चित्रीकरण हे एका खऱ्याखुऱ्या डान्स बार मध्ये करण्यात आले, आणि हा डान्स बार फक्त चोवीस तासासाठीच उपलब्ध होणार होता. या चोवीस तासात एवढ्या भव्य गाण्याचे शूटिंग करणे हे 'नशीबवान'च्या टीम समोर खरंच मोठे आव्हान होते, परंतु हे आव्हान ह्या टीमने स्वीकारले आणि ते अगदी लीलया पेललेसुद्धा. अवघ्या एका दिवसात या गाण्याचे संपूर्ण शूटिंग चांगल्या पद्धतीने पार पडली. मुख्य म्हणजे ज्या डान्स बारमध्ये हे चित्रीकरण सुरु होते त्या डान्स बारच्या बाहेर कोणालाही कल्पना नव्हती कि इथे सिनेमाचे शूटिंग चालू आहे. या सर्व मेहनतीची पोच पावती म्हणजे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोबतच या गाण्यामध्ये आनंद शिंदे याची एक खास झलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे.
https://youtu.be/qvD0_xMl6E4
उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असलेला 'नशीबवान' हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचे अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे निर्माते असून, प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.