मुंबईची गौरी आणि पुण्याचा गौतम यांची प्रेमकथा फुलत गेली ते थेट थाटामाटात लग्न होईपर्यंत या मुंबई पुणे मुंबई सिनेमाचे दोन भाग सुपहिट ठरले. आता या बहुचर्चित सिनेमाचा तिसरा भाग मुंबई-पुणे-मुंबई 3 लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच उलगडला.
या भागात गौरी-गौतमच्या घरी एका छोट्या पाहुण्याच्या आगमनाची लगबग सुरु झालीय. पण यासाठी फक्त आईनेच म्हणजेच गौरीनेच ही जबाबदारी उचलली नाहीय तर तिच्यासोबत गौतमसुध्दा तिला भक्कम साथ देताना पाहायला मिळतोय. दोघांच्याही कुटुंबियांमध्ये आनंदाला उधाण आलं आहे. पण आई होणा-या गौरीच्या मनात मात्र या नव्या जबाबदारीमुळे आपल्या करिअरला ब्रेक लागणार का किंवा आता फक्त स्वत:साठी नाही तर दुस-या जीवासाठी पण जगायचंय यासारख्या अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवलंय.
स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. सिनेमाचे निर्माते संजय छाब्रिया, सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई-३’ च्या प्रदर्शनाची घोषणा केली आणि सिनेरसिकांच्या आनंदाला उधाण आलं.
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की, “मुंबई पुणे मुंबई’ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची आता सवय लागून राहिली आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई’चे चित्रीकरण करत असताना आम्हाला याचा पुढचा भाग येईल असे वाटले नव्हते. पण दुसऱ्या भागाचे चित्रीकरण करत असताना याच्या पुढच्या भागालाही वाव आहे, हे मात्र स्पष्टपणे जाणवले होते. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काही बोलणे उचित होणार नाही, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे.”
‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिले आहेत.
येत्या 7 डिसेंबर 2018 रोजी गौरी-गौतमचा ‘मुंबई पुणे मुंबई-3’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
https://youtu.be/7U70c9_Ed8k