‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये दडलेली एकेक रहस्ये आता उलगडू लागली आहेत. त्यातील एक रहस्य म्हणजे सिनेमात ‘पिंजरा’ या १९७२ मध्ये आलेल्या अजरामर सिनेमातील “कुन्या गावाची, कोनच्या नावाची, कुन्या राजाची गं तू रानी... आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी...ग साजनी” हे गाजलेले गीत रिक्रिएट करण्यात आलं आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर हे रिक्रिएट गाणं ढोल ताशांच्या साथीने चित्रीत करण्यात आलं आहे.
या दोघांनीही या गाण्यात फुल्टू धमाल केली आहे आणि त्यांचे हे नृत्य पाहण्यासारखे झाले आहे. या गाण्याचे लॉंच ढोल ताशांच्या निनादात विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे करण्यात आले. या सोहळ्यासाठी स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, सविता प्रभुणे, मंगल केंकरे, विजय केंकरे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे हे सिनेमातील कलाकार उपस्थित होते.
सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि निर्माते व एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) यांनी या रहस्यावरील पडदा आज उलगडला. प्रख्यात निर्माते व्ही शांताराम यांच्या तुफान गाजलेल्या ‘पिंजरा’ सिनेमातील हे गाणं ‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये सामील करून ते आगळ्या पद्धतीने चित्रित केले गेले आहे.
‘गं साजणी’ या गाण्याचे पुनरुत्थान केले गेले असून त्याला राम कदम, अविनाश-विश्वजीत यांचे संगीत आहे तर आदर्श शिंदे यांचा आवाज आहे. मूळ गाणे जगदीश खेबुडकर यांचे असून त्यात विश्वजित जोशी यांनी भर घातली आहे. अतिरिक्त ऱ्हीदम प्रोग्रॅमिंग सुदेश गायकवाड यांचे आहे. या गाण्याचे चित्रीकरण साऊंडडिज येथे झाले असून ते किट्टू मायक्कल यांनी केले आहे. मिक्सिंग आणि मास्टरिंग एव्हीजे स्टुडीओजचे आहे. गाण्याच्या संगीत कलाकारांमध्ये सोमू सील (गिटार) व कोरस गायकांचा समावेश आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे.
सुपरहिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे, ख्यातनाम दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे जुळलेले यशस्वी समीकरण पुन्हा अनुभवायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा ते यशस्वी ठरणार आहे ते ‘मुंबई पुणे मुंबई-३’च्या माध्यमातून. पुढील आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात रोहिणी हट्टगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी,मंगल केंकरे आणि विजय केंकरे हे मराठीतील लोकप्रिय कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
पहिल्या दोन भागांच्या लोकप्रियतेच्या माध्यमातून गौतम आणि गौरी ही स्वप्नील-मुक्ताची जोडी आज घराघरात पोहोचली असून त्यांच्या जीवनात पुढे काय होते, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
‘मुंबई पुणे मुंबई’ हा सिनेमा बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता चित्रपटाच्या तिसऱ्या म्हणजे ‘मुंबई पुणे मुंबई ३’च्या माध्यमातून ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाण्यास सज्ज झाली आहे.