अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या लॉकडाउनमध्ये तिच्या आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडली जात आहे. कारण सोनालीचा नवा पॉडकास्ट शो सुरु झाला आहे. नुकत्याच या पॉडकास्टच्या प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागत सोनालीने तिच्या करियरमधील महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे.
एका मराठी सिनेमाच्या स्क्रिन टेस्टमध्ये रिजेक्ट झाल्याचा प्रसंग आणि त्याचं कारण सोनालीने यावेळी सांगीतलं. सोनाली म्हणते की, “एका चित्रपटाच्या ऑडिशनला गेले होते. चित्रपटाचं नाव होतं ‘बालगंधर्व’. त्यातल्या एका व्यक्तिरेखेसाठी मी स्क्रिन टेस्ट देण्यासाठी गेले होते. आणि मला स्क्रिन टेस्टमध्ये सिलेक्ट केलं गेलं नाही. याआधीही रिजेक्शनला सामोरे गेले होते. पण हे रिजेक्शन वेगळं होतं. हे रिजेक्शन होतं माझ्या दिसण्यामुळे. दिसण्यामुळे काम मिळालं नाही हे माझ्या बाबतीत पहिल्यांदाच झालं होतं. याचं कारण होतं माझा चेहरा माझा चेहरा बदलत चालला होता. पिंपल्समुळे हे होत होतं. मी निदान करून घेण्याचा प्रयत्न केला, टेस्ट करुन घेतले. बरीच वर्षे गेली याचं निदान शोधण्यासाठी. विविध डॉक्टर्सकडे गेले तरी काही फरक पडला नाही. मग मी त्याचा नाद सोडून दिला. इलाज कसा करायचा हे सापडतच नव्हतं.”
या संघर्षाला सामोरं जात असताना आलेले चढ-उतारही सोनालीने यावेळी सांगीतले. ती म्हणते की, “दररोज मेकअप काढताना मी रडायचे कारण रक्त निघायचं खूप त्रास व्हायचा. एका हिंदी सिनेमासाठीही सिलेक्ट झाले मात्र फायनल लुक टेस्टला माझ्या चेहऱ्यावरचे मोठे फोड पाहून त्यांनी मला चित्रपटातून काढून टाकलं. माझा मित्र ललित प्रभाकरने मला पुण्याचे डॉ. तावडेंविषयी सांगीतलं. त्यांनी मला गाईड केलं.”
मात्र सोनालीने या संघर्षमयी प्रवासा आपलसं करून पुढे चालत राहिली. पुढे ती म्हणते की, “चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी जास्त होत होते. मात्र त्यानंतर जसा चेहरा आहे तसा स्विकारायला मी शिकले. आज लोकं माझ्या कामाकडे बघत आहेत. ‘हिरकणी’ आणि ‘धुरळा’ सिनेमानंतर खुप छान प्रतिक्रिया आल्या. पण माझ्या चेहऱ्याविषयी कुणीही बोलत नाहीत. इतर गोष्टी सशक्त करण्याकडे माझा प्रवास सुरु आहे. संघर्षाला सामोरं जाण्याची ताकद वाढली आहे.”
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हा संघर्षमयी प्रवास कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरेल एवढं नक्की.