रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंब आणि मित्रपरिवारासमवेत रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षीत 'माऊली' सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेलेल्या प्रेक्षकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं. प्रेक्षक सिनेमा एन्जॉय करण्यासाठी गेले खरे पण क्लायमॅक्स सुरु असताना ऐनवेळी सिनेमाचा शो बंद पडल्याने प्रेक्षकांनी प्रचंड गोंधळ घातला आणि तिकीटाचे पैसे परत मागण्याची मागणी सुरु केली. हा संपूर्ण प्रकार चिंचवडच्या कार्निव्हल सिनेमागृहात घडला. यावेळी शो बंद पडल्याने व्यवस्थापकाने प्रसंगाचं गांभिर्य ध्यानात घेत प्रेक्षकांचे तिकीटाचे पैसे परत केले. तसंच तणावग्रस्त परिस्थितीवर चिंचवड पोलिसांनी हस्तक्षेप करत नियंत्रण आलं.
लोकसत्ता ऑनलाईनने दिलेल्या माहितीनुसार, सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी साडेपाच वाजता चिंचवडच्या कार्निव्हल सिनेमागृहात चित्रपट सुरू झाला. हा सिनेमा पाहण्यासाठी तब्बल २५० प्रेक्षक होते. परंतु सिनेमा संपण्याच्या अर्धा तास आधी तांत्रिक बिघाडामुळे शो मधेच बंद झाला. त्यामुळे ऐन रंगात आलेल्या सिनेमाचा क्लायमॅक्स पाहम्यास प्रेक्षक मुकले आणि त्यांचा प्रचंड संताप झाला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.