समर्थ अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केलेला अभिनेता संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. संदीपने स्वतःची करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली असून, "डोंबिवली रिटर्न" हा या निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट आहे.
श्वास, डोंबिवली फास्ट, ट्रॅफिक सिग्नल, अजिंक्य अशा अनेक चित्रपटांमुळे संदीपची अभिनेता म्हणून ओळख निर्माण झाली. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही संदीपने लक्षणीय काम केलं. मात्र, "डोंबिवली फास्ट" या चित्रपटातील माधव आपटे ही भूमिका विशेष गाजली. सर्वसामान्य माणसाचा असामान्य प्रवास या चित्रपटातून समोर आला. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. अभिनेता म्हणून भूमिकेचे कंगोरे उलगडणारा संदीप आता निर्मिती संस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम कलाकृती घडवण्यासाठी सज्ज आहे. आशयसंपन्नेसह प्रेक्षकांना आवडतील असे चित्रपट निर्मिती संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात निर्माण केले जाणार आहेत.
मी आणि माझे मित्र महेंद्र अटोले आम्ही दोघांनी मिळून "कंरबोला क्रिएशन्स" या निर्मिती संस्थेची स्थापना केली. त्यांना चित्रपटांमध्ये, विशेषतः चांगल्या आशय निर्मितीमध्ये रस आहे. आम्हा दोघांची आवड सारखीच असल्यानं आम्ही दोघं एकत्र येऊन निर्मिती संस्था सुरू केली. आमचा पहिला चित्रपट आहे "डोंबिवली रिटर्न...".
"डोंबिवली रिटर्न" ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. "डोंबिवली रिटर्न" हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील चित्रपट आहे. त्याचा पट खूपच मोठा आहे, असं संदीपनं सांगितलं असून नवीन वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.