सध्या लॉकडाउनमध्ये घरात बसून उपलब्ध असलेल्या उपकरणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध सिनेमे, लघुपट आणि व्हिडीओ तयार केले जात आहे. लॉकडाउनमुळे मनोरंजन क्षेत्रातील विविध चित्रीकरण आणि कामं सध्या बंद आहेत. मनोरंजन विश्वाचा कारभार जवळपास ठप्प झालाय. मात्र कलाकार घरात बसूनच त्यांच्या अभिनयाचं काम सुरु ठेवत आहेत. याचं ताजं उदाहरणं म्हणजे ‘डॉट्स’ ही फिचर फिल्म
सिंगापूरमधील दिग्दर्शिका शिल्पा क्रिश्नन शुक्ला यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमात विविध भाषीय फिल्म इंडस्ट्रीतील 10 कलाकार, इंग्रजी, हिंदी, मल्याळम ही भाषा आणि 2 देश एकत्र आले आहेत. घरात बसूनच या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनयात विविध प्रयोग करु पाहणारी अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता ललित प्रभाकरही या सिनेमात आहेत.
या सिनेमात पाच चाप्टर्स आणि त्यात पाच विविध संवाद असणार आहेत. यातील चौथ्या चाप्टरमध्ये अभिनेत्री पर्ण पेठे सायरा नावाची भूमिका साकारतेय. शिवाय तिच्यासोबत झळकतोय तामिळ अभिनेता राघव रंगनाथन. हा भाग इंग्रजी भाषेत चित्रीत केला आहे. अशा पद्धतिचा प्रयोग पर्ण पहिल्यांदाच करताना दिसेल. त्यामुळे पर्णसाठी हा अनुभव रंजक असणार एवढं नक्की. नुकतच तिने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर या सिनेमाचा टिझर पोस्ट केला आहे.
पाचव्या चाप्टरमध्ये अभिनेता ललित प्रभाकर हा सिंगापूरमधील ऐश्वर्य़ा कुमार नावाच्या अभिनेत्रीसोबत झळकतोय. डॉट्स हा एक सोशल मिडीया ऐप असून त्याच्या माध्यमातून दोन अनोळखी व्यक्ती कशा भेटतात आणि काय संवाद साधतात हे यात पाहायला मिळेल. असा हा आगळा वेगळा प्रयोग लवकरच प्रेक्षकांना घरात बसूनच पाहायला मिळेल. या निमित्ताने या 10 विविध भाषीय फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांचा अभिनय त्यांचा हा संवाद पाहणं आणि ऐकणं रंजक ठरेल एवढं नक्की.