2018 हे साल अनेक सुपरहिट मराठी सिनेमांनी गाजवलं त्याचप्रमाणे गाजवलं ते वेबसिरीजमध्ये काम करणा-या मराठी कलाकारांनी... मराठीतील नव्या पिढीने वेबसिरीजच्या ढंगाला आपलंसं केलं आहेच. पण जुन्या जाणत्यांनीही या माध्यमाशी स्वत:ला जोडून घेतलं आहे. जाणून घेऊया अशाच काही वेबसिरीजची दुनिया गाजवणा-या कलाकारांविषयी फक्त पिपींगमूनमराठीवर
मिथिला पारकर
मिथिलाने आजपर्यंत अनेक वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. ती वेबसिरीजची क्वीन म्हणून ओळखली जाते. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यापैकी ‘गर्ल इन द सिटी’ने तिला ओळख मिळवून दिली. यंदा तिची ‘लिटिल थिंग्ज’ सीझन २ ही वेबसिरीज रिलीज झाली. या सिरीजलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
राधिका आपटे
‘वेबसिरीजची मास्टर’ हा किताब द्यायचा झाला तर राधिका आपटे इतकं योग्य नाव शोधूनही सापडणार नाही. २०१८ मध्ये राधिकाने सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज, घुल सारख्या वेबसिरीजमध्ये काम केलं.
जितेंद्र जोशी
२०१८ मध्ये नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजमधील काटेकर ही व्यक्तिरेखा जितेंद्र जोशी यांनी अत्यंत समर्थपणे साकारली. संवेदनशील अभिनयामुळे त्याची व्यक्तिरेखा अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती बनली.
सई ताम्हणकर
मराठी सिनेसृष्टीमधील ग्लॅमरस चेहरा म्हणजे सई ताम्हणकर. सईनेही ‘डेट विथ सई’ या सिरीजद्वारे वेबसिरीजच्या विश्वात पाऊल ठेवलं आहे.
अमेय वाघ
मालिका, सिनेमा, नाटक अशा वेगवेगळ्या वाटांवरून करीअरचा प्रवास करणा-या अमेयने वेबसिरीज विश्वातही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्याने निपुण धर्माधिकारीसोबत ‘कास्टींग काऊच’ या वेबसिरीजची धुरा सांभाळली आहे.
आकाश ठोसर
‘सैराट’ फेम आकाश ठोसरने केवळ सिनेमातच नाही तर वेबसिरीजच्या विश्वातही अभिनयाची जादू पसरवली आहे. आकाशने यावर्षी ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. यामध्ये त्याने विद्यार्थाची भूमिका साकारली होती.
राजश्री देशपांडे
बहुचर्चित वेबसिरीज सेक्रेड गेम्स मधील बोल्ड भूमिकेमुळे राजश्रीचं नाव गाजत असलं तरी तिच्या अभिनयाचं कौतुकही सर्वत्र होत आहे.
संतोष जुवेकर
अनेक मराठी सुपरहिट सिनेमांचा अभिनेता संतोष जुवेकर यानेही ‘स्ट्रगलर साला’ या वेबसिरीजमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. यंदा सिरीजचा दुसरा सीझनही रसिकांच्या भेटीला आला आहे.
भाऊ कदम
विनोदाचा बादशहा भाऊ कदम याने ‘स्ट्रगलर साला’ या वेबसिरीजमध्ये काम केल्यानंतर यंदा भाऊची ‘लिफ्टमॅन’ ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजमधून भाऊ विनोदाचं टायमिंग सांभाळत रसिकांना हसवेल यात शंका नाही.
अनिकेत विश्वासराव
अनिकेतने यावर्षी पहिल्यांदाच वेबसिरीजच्या जगात पाऊल ठेवलं आहे. अनिकेत यंदा ‘पॅडेड की पुश अप’ या वेबसिरीजमधून एक वेगळा विषय घेऊन रसिकांसमोर येत आहे.