काही दिवसांपूर्वीच 'मी पण सचिन' या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. टीझर पाहून चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली असतानाच आता चित्रपटाचे नवीन पोस्टर आले आहे. या पोस्टरमध्ये स्वप्निल जोशीसोबत अभिजीत खांडकेकरही झळकत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील आक्रमक हावभाव बघून ही भूमिकाही विशेष असणार, याचा आपण अंदाज बांधू शकतो.
आता अभिजीत या चित्रपटात नक्की कोणती भूमिका साकारत आहे, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. खरं तर क्रिकेट आणि आयुष्याचा खूप जवळचा संबंध आहे. क्रिकेटमध्ये जसे शेवटच्या टप्प्यापर्यंत काही सांगता येत नाही, आयुष्यचेही अगदी तसेच असते. क्रिकेट आणि आयुष्यातील हे साम्य दाखवणारा, प्रेम, नात्याची परिभाषा शिकवणारा आणि आपल्या स्वप्नांचा माग घेण्यास प्रवृत्त करणारा हा सिनेमा येत्या १ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात स्वप्निल जोशी, अभिजीत खांडकेकर सोबत प्रियदर्शन जाधवही आहे.
इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा नीता जाधव, संजय छाब्रिया, गणेश गीते आणि निखिल फुटाणे यांनी सांभाळली आहे. तर श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरणही केले जाणार आहे