By  
on  

पॉडकास्टच्या नव्या भागात सोनालीने घेतली  ट्रोलर्सची शाळा, म्हणते असा असतो ट्रोलर्सचा 'ट्रोल नाका'

मोनरंजन विश्वातील बहुतांश प्रसिद्ध कलाकार हे सोशल मिडीयावर आहेत. आणि याचाच फायदा घेत ट्रोलर्स त्यांच्यावर निशाणा साधण्यासाठी निमित्त शोधत असतात. याच ट्रोलर्सना धडा शिकवण्यासाठी सोनालीने केलाय तिचा नवा पॉडकास्टचा एपिसोड.सोनाली सांगते ऐका हा नवा पॉडकास्ट शो सोनाली लॉकडाउनच्या काळात करतेय. आणि नुकत्याच रिलीज केलेल्या नव्या भागात सोनाली ट्रोलर्सविषयी बोलतेय. सिनेमांसह खासगी आयुष्याविषयी ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना तिने यातून सडतोड उत्तर दिलय. 

ट्रोलर्सविषयी बोलत असताना तिने धुरळा या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचा एक किस्सा यावेळी सांगीतला आहे. हा सिनेमा येण्याआधी या सिनेमातील कलाकारांनी प्रमोशनसाठी वेगळा संकल्पना केली होती. या सगळ्या कलाकारांनी #पुन्हा निवडणुक असं पोस्ट केलं होतं. त्या दरम्यानची राजकीय परिस्थिती बघता हे हॅशटॅग त्याचसाठी वापरले असावे असं कित्येकांना वाटलं आणि त्यांनी या कलाकारांना ट्रोल केलं. मात्र ही सगळी खटाटोप सिनेमाच्या प्रमोशनसाठी असल्याचं नंतर समोर आलं. शिवाय मराठी कलाकारांना मराठी भाषेचा आदर नसल्याचं बोलतही ट्रोल केलं जातं. याविषयी सोनाली म्हणते की, “मराठी भाषेवरती बोलणारी जी लोकं आहेत जे ट्रोलर्स आहेत ते स्वत: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करतात ते माहीत नाही पण आम्ही दुसऱ्या भाषेत एखादी पोस्ट टाकली तर ते जागे होतात. मग चौकात पकडल्यासारखे धडाधडा शिव्या घालायला लागतात. हे सगळे मराठी कलाकार स्वइच्छेने मराठीत काम करत आहेत याचाच अर्थ असा की त्यांचं मराठी भाषेवर प्रेम आहे. ट्रोलर्सना हा प्रश्न आहे की ट्रोलिंगशिवाय मराठी भाषा जपावी, त्याचं संवर्धन व्हावं, ती पसरावी यासाठी काय करताय?” असं म्हणत सोनालीने या ट्रोलर्सची चांगलीच शाळा घेतली आहे.
 
 जेव्हा सिनेमाविषयीच्या नकारात्मक आणि सकारात्मक प्रतिक्रिया येत असतात तेव्हा त्या कलाकारांकडून स्पोर्टिंगली घेतल्या जातात. मात्र खासगी आयुष्यात होणाऱ्या टीकेविषयी सोनाली म्हणते की, "जेव्हा टीका या खासगी आयुष्यावर होतात तेव्हा त्रास होतो. आमची नाती, परिवार, जात पात धर्म याविषयीच्या ज्या टीका आहेत त्या लोकांनी करू नये अशी माझी विनंती आहे. कारण आम्ही सुध्दा माणसं आहोत.”
या सगळ्या गोष्टींविषयी ट्रोलर्सचा 'ट्रोल नाका' म्हणत  सोनाली या नव्या पॉडकास्ट भागात सविस्तर बोलली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive