By  
on  

निखिलचा चार्म आता वेबसिरीजमधून झळकणार

छोट्या-छोट्या पण वेधक भूमिकांतून प्रेक्षक पसंतीस उतरलेला चार्मिंग चेहेरा म्हणजे निखिल चव्हाण. झी मराठीवरील 'लागीरं झालं जी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेला हा 'विक्या' चित्रपटांतूनसुद्धा आपली नवी ओळख निर्माण करताना दिसतोय. अलीकडेच आलेल्या 'अॅट्रॉसिटी' या मराठी चित्रपटामधून त्याने 'मनीष चौधरी' नामक खलनायकाची भूमिका साकारली होती. अल्पावधीतच लोकप्रियता लाभलेल्या निखिलची एन्ट्री आत्ता 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या नव्याकोऱ्या वेबसिरीज मधून झाली आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेबीसिरीज असा वाढतच जाणारा निखिलच्या अभिनयकौशल्याचा आलेख वाखाणण्याजोगा आहे.

निखीलचा अभिनय प्रवास सोप्पा नव्हता. अविनाश देशमुख ह्यांचा कडे 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटका मध्ये ५०० रुपये प्रति प्रयोगाने तो लाइट्स आणि म्युझिक करायचा. त्यातूनच पुढे त्याला सौरभ पारखे लिखित-दिगदर्शित 'थ्री चिअर्स' नाटकाची संधी चालून आली. त्यातली निखिलने साकारलेली 'जसबीर'ची व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली आणि त्याला नाटकं मिळू लागली अशातच 'अवताराची गोष्ट' आणि 'मधू इथे चंद्र तिथे' यांसारख्या निवडक चित्रपटांत त्याने छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिका केल्या.

पुण्याहून मुंबईत कामाच्या ओढीने शिफ्ट होणाऱ्या अनेक कलाकारांप्रमाणे त्याचाही काही काळ असा गेला ज्यावेळी हातात काहीच काम नव्हतं पण इच्छा प्रबळ होती. प्रत्येक कलाकराला या फेजमधून जावं लागतं पण त्यावेळी डळमळून न जाता आपला मोर्चा पुन्हा प्रोडक्शनकडे वळवत असतानाच निखिलला तेजपाल वाघ ह्यांनी संधी दिली आणि झी मराठीवरील 'लगीर झालं जी' मधुन समोर आला. फौजी विक्रमच्या भूमिकेतील निखिलला महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातील मराठी प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं त्यानंतर मात्र निखिलने पुन्हा वळून मागे पाहिलं नाही आणि झी मराठी वरील जल्लोष गणरायाचा गणपती विशेष कार्यक्रमातून निवेदक म्हणून समोर आला.

आजच्या काळाशी सुसंगत 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या सिझलिंग वेबसिरीजमध्ये सध्या निखिल 'सचिन' उर्फ 'सच्या'च्या भूमिकेत दिसत आहे. तीन मैत्रिणींच्या आयुष्यातला तिढा सोडवण्यासाठी स्वयंसज्ज असणारा हा उतावळा 'सच्या' काय-काय गमती घडवून आणतो आणि 'सच्या'च्या येण्याने त्या मैत्रिणींचा तिढा सुटतो कि आणखी गुंततो हे पाहणं रंजक ठरत आहे. आजवरच्या भूमिकांपेक्षा हटके भूमिकेत दिसणारा 'सच्या' म्हणजे आपला लाडका चॉकलेट बॉय 'निखिल चव्हाण' या ही भूमिकेतून रसिक-प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. विशिष्ट प्रकारची देहबोली, चालण्या-बोलण्यातल्या लकबी शिवाय नोदाचं अचूक बेरिंग सांभाळत निखिलने साकारलेला हा 'सच्या'ही सगळ्यांना आपलासा वाटला आणि तो मनमुराद हसवतोय देखील.

 

https://youtu.be/lHUfck-qfNw

Author

Recommended

PeepingMoon Exclusive