अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या आत्महत्येची विविध कारणं समोर येत आहेत. त्यातच सोशल मिडीयावर सेलिब्रिटी सुशांतच्या आठवणीत पोस्ट करत आहेत. तर दुसरीकडे सोशल मिडीयावर लोकं विविधं विषयावर बोलू लागले आहेत. यातच अभिनेता पुष्कर जोगने संतप्त प्रतिक्रिया देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओसबत लिहीलेल्या कॅप्शनमध्ये तो लिहीतो की,
“जोग बोलणार - खरं तर डबल स्टँडर्ड हा एक रोग आहे.आणि आपल्याला रोगाशी लढायचे आहे रोग्यांशी नाही, एखाद्याच्या मृत्यूचे असे भांडवल करणे अजिबात योग्य नाही. एखाद्याने एखाद्या कारणासाठी केलेल्या मेसेजला साधा एका शब्दात रिप्लाय सुद्धा न देणारे आज त्याच्या आत्महत्येवर "तुझ्याशी बोलायला कोणी नव्हतं का रे" असा प्रश्न विचारताहेत.. अशा ढोगिंची कमाल आहे.. असे ढोंगी मला कायम भेटलेत. मृत्यू ही शोकांतिका आहे मनोरंजन नाही. आपण या जगात जगतोय का आता ?
असं म्हणत पुष्करने संताप व्यक्त केला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येविषयीच्या विविधं गोष्टी समोर येत आहेत. त्यावर बॉलिवुडसह , त्याचे चाहते आणि सोशल मिडीयावरील नेटकरी विविध पध्दतीने व्यक्त होताना दिसत आहेत. शिवाय सुशांतसोबत कुणी बोलायला नव्हत का ? इतरांनी तो प्रयत्न का केला नाही ? अशे सल्लेही एकमेकांना देऊ लागले आहेत. यात दिसणाऱ्या ढोंगीपणावर चिड येत असल्याचं पुष्कर या व्हिडीओत बोलतोय. शिवाय प्रसार माध्यमही चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवत असल्याचं अधोरेखीत केलय.