लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांनी मुळशी तालुक्यातील जातेडे या त्यांच्या गावात नुकतच त्यांचे वडील विठ्ठल तरडे, आई रुक्मिणी, पत्नी स्नेहल, बंधू योगेश तरडे आणि कुटुंबियांसोबत भात लावणी केली.
'शेती विकायची नसते ती राखायची असते' असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे प्रविण विठ्ठल तरडे यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. यावेळी त्यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील पालकर हे देखील त्यांच्यासोबत होते.
वडील विठ्ठल तरडे यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त फेसबुकद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना प्रविण तरडे म्हणाले की, “सध्या लॉकडाऊन मुळे शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत यामुळे मी आपल्या कुटुंबियांसोबत शेतात भात लावणी करायला आलो आहे. तसेच कोरोनामुळे यंदा वारी झाली नाही यामुळे आई – वडील शेतात राबत आहेत, अन्यथा ते शेतातील कामं आटोपून वारीला निघालेले असतात. पुणे-मुंबईत कामासाठी गेलेल्या प्रत्येकाने आपल्या मातीशी असलेले नाते कायम जपावे.”
या अस्सल मातीतल्या अभिनेत्याने शेतकऱ्यांना असा मानाचा मुजरा केला आहे. प्रविण तरडे हे लवकरच मराठीतील भव्यदिव्य असा ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
My own farm .. शेती ईकायची नसती अशी राखायची असते... pic.twitter.com/hlFk14HniP
— Pravin Vitthal Tarde (@WriterPravin) June 26, 2020