'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा एक 'स्पेशल शो' माहीम येथील सिटीलाईट येथे आयोजित करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या 'या' शो साठी भाऊ कदम, लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल, चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल वसंत गोळे आणि निर्माते आदी उपस्थित होते.
भाऊ कदम यांनी यावेळी सफाई कामगारांसोबत 'नशीबवान' हा चित्रपट पहिला. 'नशीबवान' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बबन या सफाई कामगारांचे आयुष्य एका घटनेमुळे कसे अचानक बदलते आणि तो बदल हा बबन कसा हाताळतो ह्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे 'नशीबवान' हा चित्रपट. ह्या चित्रपटाला मिळणाऱ्या यशाचे गुपित म्हणजे सिनेमातील वास्तविकता. कारण ह्या सिनेमातील प्रत्येक दृश्य हे वास्तविक आहे.
नशीबवान' चित्रपटाची शूटिंग करताना सफाई कामगारांचे आयुष्य सिनेमाच्या टीमला खूप जवळून बघता आले. त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न टीमने पाहिले. शिवाय चित्रीकरण करताना ह्या सर्व लोकांनी जी मदत कलाकारांना आणि टीमला केली त्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या चित्रपटाचा एक विशेष शो या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. ह्या शोचा त्यांनी खूप आनंद लुटला. त्यांचा आनंद, त्यांचे प्रेम पाहून संपूर्ण नशीबवान' चित्रपटाची टीम खूप भावुक झाली होती.