EXCLUSIVE : सातत्याने वेगळं काहीतरी करायची  जिद्द सरोजजींमध्ये होती – महेश टिळेकर

By  
on  

मास्टरजी सरोज खान यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत काम केलेला प्रत्येक कलाकार आज हळहळ व्यक्त करतोय. त्याची जिद्द, त्यांचा उत्साह या सगळ्यांना काहीना काही शिकवून गेला.  दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर यांच्या ‘मराठी तारका’ या प्रसिध्द कार्यक्रमासाठी सरोज खान यांनी मागील वर्षी डान्स कोरिओग्राफ केले होते. त्यांच्या मागच्या वर्षीच्या कार्यक्रमासाठीही त्या आल्या होत्या. शिवाय त्या डान्स रिहर्सलसाठीही उपस्थित असायच्या. 

पिपींगमून मराठीशी बोलताना महेश टिळेकर यांनी त्यांची खास आठवण शेयर केली आहे. ते सांगतात की, “सरोजजींशी आणि माझी ओळख तीन चार वर्षांपासून होती. त्या मला महेशजी म्हणायच्या. जेव्हा मी माझ्या मराठी तारका शोच्या संदर्भात त्यांना विचारलं होतं. त्या लगेच तयार झाल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या तुझ्यासाठी नक्कीच करेल. तेव्हा त्यांनी मला सांगीतलं होतं की अनंत माने यांच्या एका मराठी सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदा मराठीमध्ये कोरिओग्राफी केली. तेव्हापासूनच त्यांना मराठी लोकांबाबत प्रेम आणि आपुलकी होती. त्यांनी माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाणी बसवली होती. त्यांच्या गाण्यांवरही आम्ही डान्स बसवला होता. आमच्या शोमधील तारका खूप नशीबवान आहेत की त्यांना सरोजजींकडे काम करायला मिळालं. त्यांचं नृत्यदिग्दर्शन त्यांना लाभलं. त्यांचं ‘मार डाला’ हे गाणंही घेतलं होतं कार्यक्रमात. पण त्यांनी या कार्यक्रमासाठी हे गाणं वेगळं कोरिओग्राफ केलं."

ते पुढे सांगतात की, "सातत्याने वेगळं काहीतरी करायची त्यांची जिद्द होती. माझ्यासोबत जेव्हा त्यांनी काम केलं तेव्हा त्या नुकत्याच आजारातून बाहेर पडल्या होत्या. तरीही त्यांनी त्या जिद्दीने काम करत होत्या त्याचं मला कौतुक वाटतं. मराठी तारका शोच्या निमित्ताने त्यांच्यात उत्साह दिसत होता. आमच्या कार्यक्रमात आम्ही त्यांचा सत्कार केला होता वहिदाजींच्या हस्ते. ते त्यांना खूप आवडलं होतं. तेव्हा त्या म्हटल्या होत्या की हे त्यांच्यासाठी लाईफटाईम गिफ्ट मिळाल्यासारखं आहे. वहिदाजी, आशा पारेख, हेलनजी, अरुणा इरानी हे सगळे एका मंचावर असणं आणि त्यांच्यासोबत माझा सन्मान होणं हे खूप मोठं आहे. असं त्या म्हटल्या होत्या.”


 

Recommended

Loading...
Share