सगळीकडे गणेशोत्सवानिमित्ताने आनंदाचं वातावरण पाहायला मिळतय. लाडके बाप्पा घरी विराजमान झाल्यानं उत्साहाचं वातावरण आहे. यातच बाप्पाच्या मूर्तीची सजावट, गोडधोड पदार्थांची चंगळही पाहायला मिळतेय. काहींनी बाप्पाच्या विविध रुपी मूर्त्या आणल्यात तर काहींनी घरातच बाप्पाची मूर्ती घडवली आहे. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेकांनी घरातच मूर्ती तयार करून त्याचं घरातच विसर्जन करायचं ठरवलय.मनोरंजन विश्वातीलही असेच काही कलाकार आहेत ते फक्त याचवर्षी नाही तर गेल्या काही वर्षांपासून घरातच बाप्पाची इको-फ्रेंडली मूर्ती घडवतात.
अभिनेता राकेश बापटला अभिनयासह कलाकुसरचीही आवड आहे. तो उत्तम चित्र काढतो. शिवाय दरवर्षी स्वत: घरातच बाप्पाची मूर्ती घडवतो. त्याने आत्तांपर्यंत बाप्पाच्या विविध सुंदर मूर्ती तयार केल्या आहेत. यावर्षीही त्याने सुंदर मूर्ती घडवली आहे. यंदा बाप्पाच्या मूर्तीला लाल रंग चढवण्यात आला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव हे गेल्या 18 वर्षांपासून घरातच बाप्पाची लहान मूर्ती तयार करून तिला रंगकाम करून तिची प्रतिष्ठापन करून इको-फ्रेंडली सजावट करतात. यंदाही त्यांनी बाप्पाची मूर्ती घरात घडवली आहे. दरवर्षी मातीची इको-फ्रेंडली मूर्ती ते तयार करतात. यंदा त्यांनी गणरायाच्या मूर्तीला जास्वंदी रंग चढवला आहे.
अभिनेता भूषण प्रधानच्या घरीही इको-फ्रेंडली बाप्पा विराजमान होता. भूषणची आई गेल्या काही वर्षांपासून घरातच बाप्पाची शाडूच्या मातीची मूर्ती तयार करते. त्या मूर्तीचं घरातच विसर्जन केलं जातं. आई मूर्ती तयार करत असताना भूषणही आईला मूर्तीकामात मदत करतो. यावर्षीही भूषणच्या आईने बाप्पाची सुंदर मूर्ती घडवली आहे.
भूषणच्या आईकडून प्रेरणा घेऊन अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने देखील यावर्षी घरातच बाप्पाची मूर्ती घडवली आहे. प्रार्थनालाही कलाकुसरमध्ये आवड आहे. ती घरात सुंदर चित्रेही काढते. यावर्षी मातीपासून तयार केलेल्या बाप्पालं प्रार्थनाने सुंदर रंग चढवून सजवलं आहे.
कवी संदीप खऱे यांनीही यावर्षी घरात बाप्पाची मातीची मूर्ती तयार केली आहे. यानिमित्ताने संदीप यांनी पहिल्यांदाच मातीकाम केलं असल्याचं त्यांच्या सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
यापैकी काही कलाकार कित्येक वर्षांपासून इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करून घरातच मूर्ती तयार करून घरातच त्याचं विसर्जन करत आहेत. तर काही कलाकारांनी यावर्षीपासून अशा पद्धतिचा इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. स्वत:च्या हाताने साकारलेला बाप्पा घरात विराजमान असल्याने कलाकारांचा आनंद या उत्सवात गगनात मावेनासा असतो.