कोरोनाग्रस्त परिस्थितीत मनोरंजन विश्वातलं चित्रीकरण पूर्ववत होताना दिसतय. यातच काही मालिका आणि रिएलिटी शोचे चित्रीकरण सुरु आहेत. 'सिंगींग स्टार' या रिएलिटी शोमधील काही स्पर्धकांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं पिपींगमून मराठीच्या एक्सक्लुझिव्ह बातमीतून समोर आलं होतं.
यापैकीच गायिका जुईली जोगळेकर आणि रोहीत राऊत या दोघांनीही कोरोनाशी झुंज दिली आणि कोरोनातून दोघे बरे झाले आहेत. दोघांनीही सोशल मिडीयावर नुकताच व्हिडीओ पोस्ट केला आहे. कोव्हीडची चाचणी केल्यानंतर पॉझीटीव्ह असल्याचं कळताच या कलाकारांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतल्याचं ते व्हिडीओत सांगत आहेत.
याविषयी जुईली म्हणते, "14 ऑगस्टला आमचं सिंगींग स्टारचं चित्रीकरण झालं होतं. त्यानंतर प्रोटोकॉल स्वइच्छेने मी माझी कोव्हीड चाचणी करून घेतली होती. मला कोणतीही लक्षणे आढळली नव्हती.आणि त्याच दिवशी संध्याकाळी टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्यानंतर मी या कार्यक्रमाच्या कोणत्याही प्रोसेसमध्ये सहभाग घेतला नाही. कोरोनानंतरचा माझा सतरावा दिवस आहे.आणि मी ठणठणीत आहे."
तर रोहीत राऊत म्हणतो की, "14 तारखेला चित्रीकरण संपल्यावर 17 ऑगस्टला कोरोना चाचणी केल्यावर माझी टेस्ट पॉझिटीव्ह आल्याचं कळलं. पण कोणतीही लक्षणे नव्हती. योग्य ती काळजी घेऊन आता मी बरा झालोय."
यासाठी जुईली आणि रोहीत राऊतने डॉक्टर, बीएमसी आणि सोनी मराठी वाहिनीचे आभार मानले आहेत. याशिवाय याच कार्यक्रमातील अभिनेता स्पर्धक अभिजीत केळकरनेही त्याला कोरोना झाल्याचं सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगीतलं आहे.