By  
on  

केदार शिंदे म्हटले, "नऊवारीत एक घरंदाजपणा आहे..", घेऊन येत आहेत नवी मालिका

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवरील त्यांच्या अकाउंटवर काही ट्विट करत आहेत. या ट्विटमध्ये ते एक नवी मालिका घेऊन येणार असल्याचं सांगतात. आता इतक्या वर्षांनी केदार शिंदे यांची मालिका येत आहे म्हटल्यावर सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 

केदार शिंदे यांचे मागील काही ट्विट पाहता प्रेक्षकांना आपलसं वाटेल असं काहीतरी ते घेऊन येत असल्याचं सांगत आहेत. मात्र नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी नऊवारी साडी आणि सुसंस्कृतपणाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे ही उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 

ते या ट्विटमध्ये लिहीतात की, "आजी, आई, बहिण, बायको.... कुणीही अशा नववारीत समोर आलं की नुसतंच पाहात रहावं असं वाटतं. वेगवेगळ्या पध्दतीचे कपडे परीधान करण्यात काहीच गैर नाही. पण पण... नववारीत एक घरंदाजपणा आहे. एक आपलेपणा सुसंस्कृतपणा आहे. असाच आपलेपणा घेऊन लवकरच TV वर मालिका आणतोय. तपशील देईनच. श्री स्वामी समर्थ."

 

'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'घडलय बिघडलय', 'हसा चकटफू' या त्यांच्या मालिका तर प्रचंड गाजल्या. शिवाय त्यांच्या काही ट्विटमध्ये त्यांनी टिपरे मालिकेसारखं काहीतरी घेऊन असल्याचा देखील उल्लेख केला आहे. तेव्हा नक्कीच प्रेक्षकांसाठी काहीतरी मोठं सरप्राईज असेल यात शंका नाही.

केदार शिंदे यांच्या मालिका, नाटक, सिनेमे हे कायमच प्रेक्षकांना भावले आहेत. तेव्हा आपलेपणा जपत केदार शिंदे आता प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येत आहेत यासाठी त्यांचे चाहते आसुसले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive