"त्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायच्या", महेश टिळेकर यांनी आशालता यांच्या आठवणींना दिला उजाळा
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखरेचा श्वास घेतला. आई माझी काळूबाई मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र मंगळवारी सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. या प्रतिभावंत अभिनेत्रीच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांच्या सिनेमांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनी देखील आशालता यांच्या खास आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी आशालता यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडीयावर शेयर केला. या फोटोत महेश यांच्यासोबत आशालता, भरत जाधव, विजू खोटे पाहायला मिळत आहेत. शिवाय त्यांनी या पोस्टमध्ये आशालता ताईंविषय़ीच्या आठवणी लिहील्या आहेत.
यापैकी एक आठवण सांगताना महेश टिळेकर लिहीतात की, "काही वर्षांपूर्वी आम्ही एकत्र फॉरेन टूर केली .तिथे एका छोट्या क्रुजवर पॅरा ग्लायडिंगची व्यवस्था होती.अनेकजण ते करताना पाहून मीही त्याचा आनंद घेतला तेंव्हा समुद्राच्या वर उंचावर मला पॅराशुट मध्ये पाहून त्यांना आनंद झाला आणि मी खाली उतरल्यावर त्यांनी लहान मूल हट्ट धरते तसं मला सांगितलं"महेशा मला पण असं पॅराशुट मधून उंचावर जायचं " त्यांचे वय पाहता मी त्यांना आधी नाही सांगितल्यावर "काही होत नाही रे मला, तू नको काळजी करू, मेलं अर्ध आयुष्य तर गेलं, आता नाही एन्जॉय करायचं तर कधी"? त्यांचा तो उत्साह पाहून मी होकार दिला. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा त्यांचा आणि माझा स्वभाव सारखाच."