लॉकडाउनच्या काळात कोरोनाग्रस्त परिस्थितीत सोशल मिडीयाचं प्लॅटफॉर्म नकारात्मक दिशेला जात असल्याचं पाहायला मिळतय. मनोरंजन विश्वातील कलाकारांना ट्रोल करणं ही गोष्ट मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. एकीकडे लॉकडाउनच्या सुरुवातीपासून ते आत्ता अनलॉक होईपर्यंत बऱ्याच नकारात्मक गोष्टी सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.
याच सोशल मिडीयाला अभिनेता सुबोध भावेने रामराम ठोकला आहे. सोशल मिडीयावरील ट्रोलिंग, मराठी कलाकारांचा अपमान, नकारात्मकता पाहता सुबोध भावेने हा निर्णय घेतल्याचं दिसतय. एकीकडे एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर कलाकार व्यक्त नाही झाले तरी ट्रोलिंग आणि व्यक्त झाले तरी ट्रोलिंग हा प्रकार सोशल मिडीयावर वाढत चालला आहे. म्हणूनच की काय अभिनेता सुबोध भावेने ट्विटर या सोशल मिडीया प्लॅटफॉर्ममधून एक्झिट घेतली आहे.
आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद.
मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे.
काळजी घ्या ,मस्त रहा!
जय महाराष्ट्र
जय हिंद— Subodh Bhave (@subodhbhave) September 23, 2020
ट्विटर अकाउंट डिलीट करत असल्याचं सांगत सुबोध भावेने शेवटची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सुबोध भावे लिहीतो की, "आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा! जय महाराष्ट्र जय हिंद"सुबोधने ट्विटर सोडल्याने त्याचे चाहते मात्र निराश झाले आहेत. त्यांनी सुबोधला अकाउंट डिलीट न करण्याची विनंतीही केली आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर ट्विटरवर मोठ्या प्रमाणात नकारात्मकता पसरली. त्यानंतर काही हिंदी कलाकारांनीही त्यांचे ट्विटर अकाउंट डिलीट केले होते.