By  
on  

Exclusive : या मालिकेसाठी मयुरी देशमुखला भाषेमुळे करावा लागला संघर्ष, लिखाणात आणखी प्रयोग करण्याची व्यक्त केली इच्छा

अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या 'इमली' या हिंदी मालिकेतून मालिनी ही व्यक्तिरेखा साकारतेय. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून झळकणारी मयुरी ही पहिल्या वहिल्या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. शिवाय मयुरीने लिहीलेल्या 'डीयर आजो' या नाटकाचा आस्वाद प्रेक्षक टेलिव्हिजनच्या माध्यमातून घेत आहेत. याच निमित्ताने मयुरीने पिपींगमून मराठीसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. यावेळी मयुरीने तिच्या करियरविषयीच्या बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.

'इमली' ही हिंदी मालिका करत असताना सुरुवातीला हिंदी भाषा हे सर्वात मोठं चॅलेंज असल्याचं मयुरी सांगते. ती म्हणते की, "ही मालिका करताना माझ्यासाठी सर्वप्रथम चॅलेंज होतं ते म्हणजे भाषा. माझं इंग्रजी भाषेवर कमांड आहे. मराठीत काम केलेलं असल्यामुळे मराठीतली सहजता वाढली होती. पण हिंदीत काम करत असताता तुमचा अभिनय आणि भाषा दोन्ही सहज हवी. माझा प्रयत्न हाच होता की पहिल्यांदा आपण हिंदी प्रोजेक्ट करत असू तेव्हा लोकांनी कामाची दखल घेतली पाहिजे. ज्या चाहत्यांची आणि प्रेक्षकांना मराठीत काम करताना माझ्यावर प्रेम केलय त्यांनी असं नको म्हणायला की ही हिंदीत जाऊन काय करतेय. ती भूमिकाही त्या लेव्हलची हवी. तर हा माझा संघर्ष होताच. पण आमच्या मालिकेचे दिग्दर्शक आतिफ खान यांंना विश्वास होता की मी मालिनी ही भूमिका करू शकेल. भाषेची सहजता हळूहळू येईल हा विश्वास त्यांनी मला दिला होता. उच्चारण व्यवस्थित येत होतं पण ती सहजता येत नव्हती. जेव्हा इतका मोठा माणूस तुमच्यावर विश्वास दाखवतो तेव्हा तुमचा विश्वास आणखी वाढतो. काही भाग मी त्यांच्या विश्वासावरच काम करत होते. मग हळूहळू भाषेशी सहजता वाढत गेली तेव्हा तुम्ही तुमच्या भूमिकेसोबत काय करता हे तुम्हाला कळत जातं. शिवाय इथे उत्कृष्ट टीम असल्यामुळे मी मराठीत जशी कम्फर्टेबल असते तशी इथेही झाले."

मयुरीने लिहीलेलं 'डीयर आजो' हे नाटक सध्या टेलिव्हिजनवर प्रसारित केलं जात आहे. या नाटकात स्वत: मयुरीचीही मुख्य भूमिका आहे. या नाटकासाठी मयुरीला अनेक प्रतिक्रिया सोशल मिडीयावर मिळत आहेत. शिवाय तरुण मंडळींनाही आजोबा - नातीचं हे नातं भावतय. या नाटकाविषयी सांगताना मयुरीने या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची आठवण शेयर केली आहे. ती सांगते की, "मी जेव्हा पहिल्यांदा हे नाटक लिहीलं होतं तेव्हा मी मराठीतील विजय केकंरे,वामन केंद्र या मराठीतील काही दिग्गजांना वाचून दाखवलं होतं. त्यांनाही खूप आवडलं होतं. त्यावेळी त्यांनी हे मोठ्या लेव्हलवर घेऊन जाण्यासाठी सांगीतलं. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी नाटक करु शकले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग जेव्हा बालगंधर्व पुणे येथे झाला होता तेव्हा आम्हाला स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं. तो प्रतिसाद अत्यंत भन्नाट होता. मी पूर्ण आनंदाने भरून गेले होते. खूप कमाल प्रतिसाद मिळाला होता. सातत्याने या नाटकासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आणि कौतुक झालं होतं. माझ्या सारख्या तरुण लेखिकेला पहिल्याच प्रयोगाला असा प्रतिसाद मिळणं खरच मी ही अपेक्षाही केली नव्हती."

सध्या मालिकेच्या चित्रीकरणामुळे मयुरीला लिखाण करण्याचा वेळ मिळत नसला तरी लिखाणात आणखी प्रयोग करण्याची इच्छा बोलून दाखवली. ती म्हणते की, "लिखाण मला अजून करायचं आहे. प्रेक्षकांनी मला जो आत्मविश्वास दिला आहे त्यातून मी आणखी लिहू शकते असं मला वाटतय. माझ्या विचारांनी समाजावर इतका प्रभाव पाडला ते समाधान खूप वेगळ्या लेवलचं आहे. सध्या मालिका करत असल्यामुळे वेळ मिळत नाही. अभिनेत्री आणि लेखिका असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे सध्या लिखाणासाठी वेळ मिळत नाही. पण माझी इच्छा आहे की लिखाण सुरु ठेवणार आहे. काही गोष्टींचा विचार डोक्यात आहे आणि कॉन्सेप्टही आहे ज्याचा विचार मी करतेय आशा करते की त्यावर मी लवकरच काम करेन."

मागील वर्षी मयुरीचा पति आशुतोष भाकरेने नैराश्येत आत्महत्या केली होती. पतिच्या निधनानंतर मयुरीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र खचून न जाता मयुरी पुन्हा जोमाने कामाला लागली. आगामी काळात काही मराठी चित्रपटांमध्येही मयुरी झळकणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive