Exclusive : “कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र ‘दीन’ झाला”, सर्वसमावेशकता असलेला महाराष्ट्र आणि कोरोनग्रस्त परिस्थितीवर व्यक्त झाला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे

By  
on  

आज महाराष्ट्र दिन..या महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती मात्र बिकट आहे. ज्या महाराष्ट्राने सण-उत्सव, विविध कार्यक्रम उत्साहात साजरे केले त्याच महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला आहे. या कोरोनाकाळातील महाराष्ट्राच्या परिस्थितीवर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे व्यक्त झाला आहे. नाटक, मालिका, चित्रपट, रिएलिटी शो यांच्या माध्यमातून अभिनय कौशल्याने तो प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.. पिपींगमून मराठीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संकर्षणशी संवाद साधला आहे.

सध्याच्या महाराष्ट्राच्या परिस्थिविषयी कलाकार म्हणून संकर्षणने म्हणतो की, “मला असं वाटतय की या सगळ्यातून महाराष्ट्र लवकरता लवकर बाहेर पडावा. आत्ताची अवस्था म्हणजे कोरोनामुळे आपला महाराष्ट्र ‘दीन’ झालाय. पुढे काय होणार आहे या सगळ्याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह आहेत. सध्या कुठेही मत मांडून कुणालातरी नावं ठेवून काही होणार नाही. स्वत:ची काळजी घेऊन स्वत: घरात राहुन ही परिस्थिती हाताळण्याशिवाय कोणता पर्याय नाही. मी सुरक्षित तर महाराष्ट्र सुरक्षित अशी भावना घेऊन जर आपण जगलो तर आपण खऱ्या अर्थाने आत्ताच्या आधुनीक महाराष्ट्राचे मावळे होऊ अन्यथा फार अवघड आहे.”

विविधतेने नटलेल्या या महाराष्ट्राचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे सर्वसमावेशकता. संकर्षणने त्याच्या नाटकांचे महाराष्ट्रभार दौरे केले आहेत. यात त्याला जी सर्वसमावेशकता जाणवते त्याविषयी तो सागंतो. “महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे आपल्यात सर्वसमावेशकता खूप आहे. कोकणात गेल्यावर तिथल्याही नाटकांच्या दौऱ्यांना छान प्रेम मिळतं. मराठवाड्यात गेल्यावर किंवा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात गेल्यावर तिथेही छान प्रेम मिळतं. तितकीच गर्दी करुन छान प्रेम देतात तेव्हा सर्वसमावेशकता आपल्यात खूप आहे आणि कलेवर प्रेम करण्याची वृत्ती खूप आहे हे जाणवतं. आपल्याकडे नैसर्गिक तफावत, भाषेची भिन्नता आहे वेशही खूप वेगवेगळा आहे. या सगळ्यांची एकता जी आहे ती कमाल आहे. हे सगळं मिळून आता सकारत्मक दिशेकडे काहीतरी व्हावं असं मनापासून वाटतंय.”

महाराष्ट्रातील कोणत्या घटकाविषयी संकर्षणला लिखाणातून किंवा बोलण्यातून व्यक्त व्हावं असं वाटत ? या प्रश्नाचं त्याने असं सविस्तर उत्तर दिलय. “मला राजकारणाविषयी काहितरी मत मांडावं असं नेहमी वाटतं. पण आपल्याकडे त्याकडे व्यापक पद्धतिने पाहणारे लोक फार कमी असल्याचं मला जाणवत. एखाद्या कलाकाराने एखादी पोस्ट राजकारणाच्या संदर्भात टाकली की त्याला ट्रोल केलच जातं. मी वरिष्ठ पत्रकार रोहित सरदानाविषयी पोस्ट केली होती ज्याची त्याची बातमी झाली. त्यावर लोकांनी ट्रोल केलं. फार वाटतं की महाराष्ट्रातील किंवा देशातील राजकारणाविषयी बोलावं पण हे व्यक्त करायची मला आता भिती वाटते. त्याच्यापासून मी लांब राहतो पण राजकारणाविषयी काहीतरी भाष्य किंवा कविता करावं असं वाटत असलं तरी ते शक्य होणार नाही.”

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेने घरात राहुन काळजी घेणं गरजेचं असल्याचं संकर्षण सांगतो. “पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मावळे तयार केले त्यात त्यांनी जातपात पाहिली नाही. प्रत्येक घरातून एक मावळा बाहेर पडून महाराष्ट्राच्या रक्षणासाठी स्वराज्यासाठी लढला. त्याचं फळ आपण आज भोगतो आहोत. आत्ताच्या काळात सुद्धा प्रत्येकाला मावळा बनण्याची संधी आहे ती घराच्या बाहेर बडून नाही तर घरात राहुन. मला असं वाटतय की आपल्या महाराष्ट्राचं स्मरण आपणच डोळे झाकून करावं. आपल्यावरती घरात राहण्याची जबाबदारी सरकारने म्हणा निसर्गाने, नियतीने म्हणा असं समजून घरात रहावं आणि स्वत:ची काळजी घ्या. एक, दोन महिने तरी पथ्य पाळा तर तिसऱ्या महिन्यात आपण सगळे उराउरी भेटू शकू अशी मला खात्री आहे.”

Recommended

Loading...
Share