Mothers Day Exclusive : अभिनेत्री सोनाली खरेचं मुलगी सनायासोबत मैत्रीचं नातं, सोनाली म्हणते "मुलांसोबत मोकळा संवाद महत्त्वाचा"

By  
on  

अभिनेत्री सोनाली खरे आणि मुलगी सनाया या आई-मुलीच्या जोडीचं मैत्रीपूर्ण नातं आहे.  सोशल मिडीयावरही ही आई-मुलीची जोडी चर्चेत असते. मदर्स डेच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आहे. यावेळी दोघींमध्ये होणारा संवाद हे त्यांच्या नात्यातील मैत्रीचं महत्त्वाचं कारण असल्याचं त्यांनी सांगीतलं. 


सोनाली म्हणते की, “पूर्वी आपल्याला आई-वडिलांचा आदरपूर्वक धाक असायचा. ती त्या काळाची गरज होत होती पण आता काळ बदलत चालला आहे. आपणही या काळासोबत बदललं पाहिजे. आता लहान मुलांना सोशल मिडीयाही कळतोय, ऑनलाईन शिक्षणही ते घेत आहेत. पण या गोष्टींचा दुष्परिणामही होऊ शकतो. अशावेळी त्यांच्यासोबत मोकळा संवाद साधणं गरजेचं आहे. त्यात धाकही महत्त्वाचा आहे. आता नवीन काळ आहे त्यात ऑनलाईन विश्वामुळे त्यांच्यात फरक पडतोय अशावेळी आपल्याकडून त्यांना रिलॅक्स करणं महत्त्वाचं वाटतं. माझीही कधी कधी सनायासोबत चिडचिड होते. पण तिलाही माहिती आहे की तिला काहीही बोलायचं झालं तर ती स्वत: येऊन माझ्याशी बोलते. सुरुवातीपासून आम्ही एकमेकांमध्ये मोकळा संवाद ठेवला आहे”


याविषयी सनाया सांगते की, “मी आईसोबत खूप गोष्टी शेयर करते आणि माझा आईवर खूप विश्वास आहे. मी सगळ्या गोष्टी तिला सांगते आणि ती मला समजून घेते आणि एखाद्या मैत्रीणीसारखी ती माझं सगळं ऐकते.”
मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या सोनाली खरेची मुलगी सनायानेही आता अभिनयात पदार्पण केलं आहे. ‘ब्लड रिलेशन’ या शॉर्ट फिल्ममधून ती झळकली आहे. सोनालीप्रमाणेच सनायालाही अभिनय क्षेत्राची आवड आहे. मात्र दोघींमध्ये आणखी एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे प्राणीप्रेम.

सोनाली सांगते की, “मला लहानपणापासून प्राण्यांची प्रचंड आवड आहे. सनायालाही माझ्यासारखी प्राण्यांची आवड निर्माण झाली आहे. तिची इच्छा आहे की तिला मोठं होऊन एक मोठं घर घ्यायचय. जिथे तिला रेस्क्यू केलेले प्राणी ठेवायचे आहेत.”

सोनालीचं तिच्या मुलीसोबत असलेल्या मनमोकळ्या नात्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सोनालीचं तिच्या आईसोबत असलेला मनमोकळा संवाद. “मला माझ्या आईकडून वेळेचं महत्त्वं समजलय. आईने मला खूप प्रोटेक्ट केलय. तिच्या जीवनाचा माझ्यावर खूप परिणाम झालाय. वेळेला महत्त्व देणं हे मी आईकडून शिकलेय. आणि ते मी सनायालाही शिकवते. लग्नाच्या आधीही मी सगळं आईसोबत शेयर करायचे. आधीपासूनच माझा आईसोबत मनमोकळा संवाद असायचा. जीवनाप्रतीचा एक सकारात्मक दृष्टीकोन आईनं मला दिलाय..”


मातृ दिनाच्या निमित्ताने निसर्गही आपली आई असल्याचं सांगत त्याची काळजी घेण्याचा महत्त्वाचा संदेश सोनाली देते. सोनाली म्हणते की, “सध्या आपल्यासाठी आपला निसर्ग ही आई आहे. त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतय. त्या निसर्गाची काळजी घेऊयात. निसर्गासाठी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करुयात. जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीलाही या मदर नेचर, निसर्गाचा आशिर्वाद मिळेल.”

सोनालीने आत्तापर्यंत विविध मराठी चित्रपट आणि मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केलंय. ‘आज काय स्पेशल’ या फूड स्पेशल कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनालीने केलय. सोनाली ही अभिनेता बिजय आनंद यांची पत्नी आहे. 

Recommended

Loading...
Share